“भारतात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ”; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावरुन पंतप्रधान मोदींचे जागतिक नेत्यांचे आवाहन

कोविडच्या सुरुवातीपासून आम्ही ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देत आहोत, हा कदाचित जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे,” असे मोदी म्हणाले.

Best time to invest in India PM Modi appeal to world leaders from World Economic Forum
(फोटो ANI))

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाइन होणार्‍या पाच दिवसीय दावोस अजेंडा समिटच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जगाची परिस्थिती’ या विषयावर भाषण केले. ‘दावोस अजेंडा’ शिखर परिषद सलग दुसऱ्या वर्षी डिजिटल पद्धतीने आयोजित केली जात आहे. यावेळी १३० कोटी भारतीयांच्या वतीने मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेल्या दिग्गजांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिली.

“भारतासारख्या सशक्त लोकशाहीने संपूर्ण जगाला एक सुंदर भेट दिली आहे, आशेचा पुष्पगुच्छ. या पुष्पगुच्छात आम्हा भारतीयांचा लोकशाहीवर अतूट विश्वास आहे. करोनाच्या या काळात, ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेला अनुसरून भारत अनेक देशांना अत्यावश्यक औषधे, लस देऊन करोडो लोकांचे जीवन कसे वाचवत आहे हे आपण पाहिले आहे. लस देऊन, करोडो जीव वाचवत आहेत. आज भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा फार्मा उत्पादक देश आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“भारत आर्थिक क्षेत्रात तसेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आशादायी दृष्टी घेऊन पुढे जात आहे. भारत आज अवघ्या एका वर्षात १६० कोटी करोना लसीचे डोस देण्याच्या आत्मविश्वासाने भरलेला आहे. कोविडच्या सुरुवातीपासून आम्ही ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देत आहोत, हा कदाचित जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे,” असे मोदी म्हणाले.

भारतात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ

“आज भारत जगाला मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर अभियंते पाठवत आहे. ५० लाखांहून अधिक सॉफ्टवेअर डेव्हलपर भारतात काम करत आहेत. आज भारतात युनिकॉर्नची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या सहा महिन्यांत १० हजारांहून अधिक स्टार्ट-अपची नोंदणी झाली आहे. आज भारत सरकारचा हस्तक्षेप कमी करून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ला प्रोत्साहन देत आहे. भारताने कॉर्पोरेट कर दर सुलभ करून, कमी करून जगातील सर्वात स्पर्धात्मक बनवले आहे. भारताची नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता लक्षात घेता, भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आज भारतातील तरुणांमध्ये उद्योजकतेची नवी ऊर्जा आहे. २०१४ मध्ये फक्त काहीशे नोंदणीकृत स्टार्टअप होते. आज ही संख्या ६०,००० च्या पुढे गेली आहे, असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांना सांगितले की, “भारतात गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. भारतीयांमध्ये नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे, उद्योजकतेची भावना आहे, ते आमच्या प्रत्येक जागतिक भागीदाराला नवी ऊर्जा देऊ शकतात. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.”

मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड – पंतप्रधान मोदी

‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या कल्पनेने आम्ही पुढे जात आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दूरसंचार, विमा, संरक्षण आणि एरोस्पेस व्यतिरिक्त, भारताला आता सेमीकंडक्टरच्या क्षेत्रातही मोठ्या संधी आहेत. मिशन लाइफ ही जागतिक जन चळवळ बनली पाहिजे. जागतिक हवामान बदलाची ही गुरुकिल्ली आहे. जागतिक व्यवस्थेतील बदलांमुळे कुटुंब म्हणून आपल्यासमोरील आव्हानेही वाढत आहेत. त्यांच्याशी लढण्यासाठी प्रत्येक देशाने एकत्रित आणि समन्वित कृती करण्याची गरज आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय, महागाई आणि हवामान बदल ही अशीच उदाहरणे आहेत, असे मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best time to invest in india pm modi appeal to world leaders from world economic forum abn

Next Story
प्रजासत्ताक दिनी तब्बल ७५ लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर संचलनात सलामी देणार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संरक्षण दलाची जोरदार तयारी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी