युरोपचा आता पानबंदीचा ‘विडा’!

स्वतच्या नागरिकांच्या आरोग्याची भलतीच काळजी असलेल्या युरोपीय महासंघाने भारतातून येणाऱ्या पदार्थावर बंदी घालण्याचा विडाच उचलला असल्याचे प्रतीत होत आहे.

हापूसपाठोपाठ पानालाही युरोप प्रवेशबंदी..
स्वतच्या नागरिकांच्या आरोग्याची भलतीच काळजी असलेल्या युरोपीय महासंघाने भारतातून येणाऱ्या पदार्थावर बंदी घालण्याचा विडाच उचलला असल्याचे प्रतीत होत आहे. १ मेपासून हापूससह चार भारतीय भाज्यांवर बंदी लादणाऱ्या या युरोपीय महासंघाने आता विडय़ाच्या पानाला नकारघंटा दर्शवली आहे. भारतातून येणाऱ्या विडय़ाच्या पानावरील सॅलमोनेला या जिवाणूचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे युरोपीय महासंघाचे म्हणणे आहे.
फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे कारण पुढे करत युरोपीय महासंघाने १ मेपासून हापूस आंब्यासह चार भारतीय भाज्यांवर बंदी लादण्याचा निर्णय घएतला. युरोपीय महासंघाच्या या बंदीनिर्णयाविरोधात बराच गाजावाजा झाला. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या प्रकरणी ब्रिटनला जाब विचारणार असल्याचेही जाहीर केले. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या गदारोळात हा मुद्दा मागेच पडला. आता युरोपीय महासंघाने विडय़ाच्या पानावर बंदी लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विडय़ाच्या पानांमध्ये २०११ पासून सातत्याने सॅलमोनेला जिवाणू आढळत असल्याने ब्रिटनला सुरक्षेच्या उपाययोजना आखणे गरजेचे वाटले आणि त्यामुळेच बांगलादेशातून विडय़ाची पाने आयात करण्यावर तात्पुरती बंदी घालावी लागली. त्याचप्रमाणे भारत आणि थायलंडमधून येणाऱ्या पानांची कडक तपासणी करावी लागली, असे रॅपिड अलर्ट सिस्टीम फॉर फूड अ‍ॅण्ड फीड (आरएएसएफएफ) या युरोपीय संस्थेने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Betel leaves bans in europe

ताज्या बातम्या