भारताशी विश्वासघात करणाऱ्या कुणालाही जगात कुठेही सुरक्षित आश्रय मिळू नये यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग, केंद्रीय सतर्कता आयोग यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सतर्कता आयुक्त व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त बैठकीस गुजरातमधील केवडिया येथे पंतप्रधान मोदी यांनी दूरसंवादाद्वारे संबोधित केले.

मोदी म्हणाले की, कुणी व्यक्ती कितीही शक्तिशाली असला तरी त्याच्याविरोधात देशाच्या हितासाठी कठोर कारवाई केली जावी. पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारा नीरव मोदी, मेहुल चोक्सी, उद्योगपती विजय मल्ल्या यांनी परदेशात आश्रय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. मोदी म्हणाले की, आपले सर्वांचे इमान मातीशी असले पाहिजे. भारतमातेशी असले पाहिजे. देशाला फसवणाऱ्यांना परदेशात आश्रय मिळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जे लोक देशाला फसवतात ते विश्वासघातकीच असतात. आमच्या सरकारच्या कठोर परिश्रमातून गेल्या सहा -सात वर्षात भ्रष्टाचार थांबवता येतो असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

मागील सरकारांनी भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न केला नाही. मागील सरकारांनी ज्या पद्धतीने काम केले त्यात भ्रष्टाचार रोखण्याची राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीच नव्हती. आज राजकीय इच्छाशक्ती तर आहेच शिवाय भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासकीय उपाययोजना केल्या जात आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांची मनोवृत्ती त्यांचे सगळ्यावर नियंत्रण असावे ही होती. त्यातून अनेक गैरमार्गांचा उदय झाला. नियंत्रण मग ते कुटुंबातील असो की, देशातील त्यामुळे नुकसानच होते. आम्ही नियंत्रण कमी करून लोकांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. त्यात गेल्या सात वर्षात तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांचा विश्वास संपादन केला. भ्रष्टाचार रोखण्यासाठी तंत्रज्ञान वापरता येते हे आम्ही दाखवून दिले. आता लोकांचा त्यावर विश्वास बसला आहे. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ गुन्हे शोधावर समाधान मानू नये. केंद्रीय अन्वेषण विभाग व केंद्रीय सतर्कता आयोग यांच्या अधिकाऱ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून लोकांना वाचवावे.