नैसर्गिक वायूच्या किंमती ठरवण्याच्या मुद्द्यावरून वादाच्या भोव-यात सापडलेले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्तींना अकारण महत्व द्यायचे थांबवणे, हेच लोकशाहीसाठी हितकारक असल्याचे सांगितले. अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनावेळी विधेयकाचा मसुदा ठरवणा-या समितीमध्ये आपण कायदामंत्री असताना केलेल्या केजरीवालांच्या निवडीच्या निर्णयाचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचे मोईली यांनी सांगितले. त्यावेळी समितीमध्ये केजरीवालांची निवड करून आपण चूक केली, कारण केजरीवालांनी त्याचा वापर आपली वैयक्तिक प्रतिमा उंचावण्यासाठी केला. तसेच यापुढील काळात केजरीवाल यांच्यासारख्या लोकांसदर्भात चर्चा करून शक्ती वाया घालवणे, हे देशाच्या हिताचे नाही. भारतीय लोकशाहीच्या हितासाठी केजरीवाल यांना गांभीर्याने घेणे टाळले पाहिजे या मतावर आपण ठाम असल्याचे वीरप्पा मोईलींनी सांगितले.