गेल्या काही दिवसांपासून Better.com कंपनी चर्चेत आहे. कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी तीन मिनिटांच्या झूम कॉलदरम्यान कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या नऊ टक्के आहे. विशाल गर्ग भारतीय वंशाचे असल्याने आपल्याकडेही या बातमीची चांगलीच चर्चा रंगली होती. विशाल गर्ग यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Video: तीन मिनिटांचा Zoom Call आणि ९०० कर्मचारी झाले बेरोजगार; भारतीय वंशाचा CEO जगभरात चर्चेत

मात्र यानंतर विशाल गर्ग यांना टीकेचा सामना करावा लागला होता. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान यानंतर विशाल गर्ग यांनी माफी मागितली असून ज्याप्रकारे संवाद साधला ती खूप मोठी चूक झाल्याचं म्हटलं आहे.

“माझ्या लक्षात आलं आहे की, ज्या पद्धतीने मी संवाद साधला त्यामुळे ही वाईट परिस्थिती अजूनच बिघडली”, असं विशाल गर्ग यांनी पत्रात म्हटलं आहे.

अमेरिकेसहीत जगभरामधील अनेक देशांमध्ये सुट्ट्यांचा कालावधी सुरु होतोय. त्यापूर्वीच कंपनीने कॉस्ट कटिंगचा विचार करुन मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केली. कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे याची कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना देण्यात आली नव्हती.

विशाल गर्ग यांनी अमेरिका आणि भारतातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मार्केट, कामगिरी तसंच उत्पादकता ही कारणं सांगत निर्णय जाहीर केला होता. बेटर डॉट कॉमची गुंतवणूक जपानमधील सॉफ्ट बँकेमध्ये आहे. या कंपनीचं एकूण मूल्य हे ७ अब्ज डॉलर इतकं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने केवळ तीन मिनिटांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पिंक स्लिप दिली. ‘मार्केट बदललं आहे. आपल्याला संघर्ष करत राहयला हवं. त्यामुळेच हा निर्णय स्वीकारुन तुम्ही पुढे वाटचाल करावी,’ असं गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं.