कर्जाचा हप्ता थकलाय.. बँकेने नोटीस पाठवूनही हप्ता तसाच थकीत आहे? तर मग सावधान! तुमच्या छायाचित्रासकट तुम्ही थकवलेल्या कर्जाच्या रकमेचा तपशील वर्तमानपत्रात छापून येण्याची दाट शक्यता आहे.. कर्जाचा हप्ता थकवणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आता बँकांनी हा नवा पवित्रा घेतला असून स्टेट बँकेने तर ‘शुभस्य शीघ्रम’ही केले आहे. तेव्हा कर्ज थकवणाऱ्यांनो खबरदारी घ्याच!
कर्ज घेऊन त्याचे हप्ते थकवणाऱ्या थकबाकीदारांना धडा शिकवण्यासाठी स्टेट बँकेने राजधानी दिल्लीत वरील प्रकाराला सुरुवात केली आहे. थकबाकीदारांच्या थकीत रकमेचा तपशील, त्यांनी घेतलेले कर्ज यांचा तपशील त्यांच्या छायाचित्रांसकट बँकाने प्रसिद्ध केला असून १५ दिवसांच्या आत या थकबाकीदारांनी थकीत हप्ता न भरल्यास या थकबाकीदारांच्या जामीनदारांची छायाचित्रे व त्यांचा तपशीलही छापण्याची नोटीस बँकेने स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे. स्टेट बँकेच्या या पवित्र्यामुळे आता इतरही बँकांनी थकबाकीदारांना वठणीवर आणण्यासाठी याच पवित्र्याचा अवलंब करण्याचा निर्धार केला आहे. मात्र, उत्पन्न चांगले असूनही जाणूनबुजून कर्जाचा हप्ता थकवणाऱ्यांविरोधातच ही कारवाई केली जाणार असल्याचे बँकिंग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

काय होणार कारवाई?
*     थकबाकीदाराला आधी नोटीस जारी केली जाईल
* विहित मुदतीत थकलेला हप्ता न भरल्यास त्याचे छायाचित्र व इतर तपशील वर्तमानपत्रात जाहीर केला जाईल
*    थकबाकीदार ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील वर्तमानपत्रात हा तपशील जाहीर केला जाईल
*    परिसरातील बँकांनाही याची कल्पना दिली जाईल
*    वर्तमानपत्रातील नोटिसीनंतर १५ दिवसांच्या आत थकबाकीदाराने हप्ता भरावा
* १५ दिवसांत हप्ता न भरल्यास त्याला जामीन राहिलेल्यांची छायाचित्रे व इतर तपशील वर्तमानपत्रात जारी केला जाईल