दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे. यामार्फत वाहनधारक आता बीएच अर्थात भारत सीरिजमध्ये (BH) आपल्या नवीन वाहनांची नोंदणी करू शकणार आहेत. खरंतर, एका राज्यातील दुसऱ्या राज्यात जायचं म्हटलं तर नियमानुसार वाहनधारकानं वर्षभराच्या आपल्या वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागते. मात्र, या भारत सिरीजमुळे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहनधारकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. ते दुसऱ्या राज्यात जुन्या नोंदणी क्रमांकावरून आपली वाहनं चालवू शकतात.

कोणाला सर्वाधिक फायदा?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या नव्या भारत सिरीजचा सर्वाधिक फायदा नोकरीच्या किंवा कामाच्यानिमित्ताने वारंवार इतर राज्यात जावं लागणाऱ्या, त्याचप्रमाणे सततच्या बदल्या होणाऱ्या व्यक्तींना होणार आहे. कारण, या लोकांची सततच्या नोंदणीच्या त्रासातून मोठी सुटका होणार आहे. एखादी व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर १२ महिन्यांनंतर नव्या राज्यात आपल्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागते. यासाठी सर्व कागदपत्रं सादर करून विविध प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे हे काम अत्यंत किचकट आणि त्रासदायक ठरत. मात्र, बीएच सीरिज या योजनेमुळे वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं लागणाऱ्या खासगी वाहनधारकांना निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे.

कसा मिळणार दिलासा?

सद्यस्थितीत कोणत्याही खाजगी वाहनधारकाला आपल्या वाहनाची नोंदणी करताना आपल्या मूळ राज्यात १५ वर्षांसाठी तर दुसऱ्या राज्यात गेल्यास पुन्हा १० ते १२ वर्षांसाठी (त्या त्या राज्याच्या कराच्या प्रमाणानुसार) रस्ते आणि वाहतूक कर भरावा लागतो. मात्र, बीएच सीरिज योजनेमध्ये हा कर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच १० लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी ८ टक्के तर १० ते २० लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी १२ टक्के इतका कर असणार आहे. दुसरीकडे डिझेल वाहनासाठी २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल, तर इलेक्ट्रिक वाहनासाठी २ टक्के सवलत दिली. त्याचप्रमाणे, १४ वर्षांनंतर वाहनावर आधीच्या कराच्या तुलनेत निम्मा वार्षिक कर आकारला जाणार आहे.

बीएच सिरीजमध्ये नोंदणी केलेलं वाहन हे जुन्या नोंदणी क्रमांकावरूनच दुसऱ्या राज्यात चालवता येऊ शकतं. त्यासोबतच, ह्यामुळे वाहनधारकाला आपल्या मूळ राज्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता भासणार नाही. रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बीएच सिरीजमध्ये नोंदणीची सुरुवात वाहनाच्या नोंदणीच्या पहिल्या वर्षापासून सुरू होईल. त्यावर BH ही अक्षरं आणि पुढे अल्फान्यूमरिक असतील. दरम्यान, या नव्या योजनेचं प्रचंड कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

कोणाला मिळणार लाभ?

भारत सिरीजची ही योजना ही खरंतर सुरुवातीला ऐच्छिक असणार आहे. त्याचप्रमाणे, सर्वात आधी संरक्षण, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रमसंबंधित कर्मचारी यांनाच या भारत सिरीज योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, चार किंवा चारपेक्षा अधिक राज्यांमध्ये कार्यालय असलेल्या खासगी कंपन्यांनाही ह्यात विशेष सुविधा दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.