Bhagwant Mann viral video controversy: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरुन पंजाबमध्ये राजकारण तापले आहे. भाजपाने मुख्यमंत्री मान यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्यासह अकाल तख्तची माफी मागण्याची मागणी केली आहे. तर, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील व्यक्ती मी नाहीच, असा दावा मान यांनी केला असून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधकांनी मला बदनाम करण्यासाठी ही खेळी खेळल्याचा आरोप मान यांनी केला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. तसेच हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार केल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.
व्हायरल व्हिडीओचे प्रकरण काय?
शीखांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या अकाल तख्तकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर कठोर शब्दात टीका करण्यात आली. कथित व्हायरल व्हिडीओवरुन मान यांना ‘गुरुद्रोही’ आणि ‘खालसा पंथ विरोधी’ ठरविले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार केल्याचा दावा मान यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती शीख गुरुंचा अवमान करत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन मुख्यमंत्री मान यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मान यांचे स्पष्टीकरण
व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांचा नसल्याचे स्पष्टीकरण भगवंत मान यांनी दिले आहे. “व्हिडीओत दिसणारा व्यक्ती मी नाही. व्हिडीओमधील व्यक्तीची उंची आणि शरीरयष्टी माझ्याशी जुळत नाही. पण, धार्मिक संस्थांच्या उच्च पदावर बसलेल्या व्यक्ती या चुकीच्या गोष्टींना आणि प्रचाराला कशा बळी पडत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते”, असे या वादावर स्पष्टीकरण देताना मान म्हणाले. तर, दुसरीकडे शीख धर्मगुरूंनी शीख समाजाला मान यांच्याशी संबंध तोडण्याची सूचना केली आहे.
पंजाब माझ्या हृदयात – भगवंत मान
शीख धर्मगुरूंनी पंजाब राज्याच्या धर्मद्रोह विरोधी कायद्याच्या संदर्भाने, पक्षाचा विचार न करता पंजाबमधील सर्व शीख आमदार आणि पंजाब मंत्रिमंडळातील सदस्यांसह, २९ जून रोजी अकाल तख्तसमोर हजर राहण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, मान यांनी त्यांना बदनाम करण्यासाठी चिखलफेक केली जात असल्याचा आरोप केला आहे. “मी पाणी, गुरबानी, शेती आणि तरुणांच्या संरक्षणासाठी निर्णय घेत आहे, आणि त्यांना हे अजिबात सहन होत नाही,” असे मान यांनी त्यांची बाजू मांडताना म्हटले. “पंजाब माझ्या हृदयात आहे आणि मी दिवस आणि रात्र यासाठी काम करतोय”, असेही मान पुढे म्हणाले.
