महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याने विमानात प्रोटोकॉल तोडत वाचवले प्रवाशाचे प्राण; पंतप्रधान मोदींनीही दखल घेत दिली शब्बासकी, म्हणाले…

दिल्लीवरुन मुंबईला येणाऱ्या विमानामध्ये त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचवल्याबद्दल मोदींनीही केलं कौतुक

modi bhagwat karad
पंतप्रधानांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना

डॉक्टर म्हणजे देवाचं रुप असतो असं म्हणतात. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी हेच खरं करुन दाखवलं. झालं असं की सोमवारी डॉक्टर भागवत हे दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. अचानक कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. विमानातील क्रू मेंबर्सने उद्घोषणा करुन ऑन बोर्ड कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केली. हे ऐकताच केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड यांनी लगेच त्या प्रवाशाजवळ जाऊन त्याला प्रथमोपचार देत त्याचा जीव वाचवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कराड यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कामाची दखल घेतली आहे. इंडिगो एअरलाइन्सने डॉक्टर कराड हे रुग्णाला मदत करत असतानाचा फोटो ट्विट करत त्याचं कौतुक केलं आहे. तसेच गरजेच्या वेळेस धावून आल्याबद्दल डॉक्टर कराड यांचे आभार मानले आहेत. “आम्ही आपले ऋणी आहोत. आपल्या कर्तव्याबद्दल नेहमीच दक्ष असणाऱ्या या केंद्रीय मंत्र्याचं आम्ही कौतुक करतो. डॉक्टर कराड यांनी एका प्रवाशाला मदत करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली तयारी ही खरोखरच प्रेरणादायी आहे,” असं इंडिगोने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनीही इंडिगोचे हे ट्विट कोट करुन रिट्विट करत, “ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे,” असं पंतप्रधान म्हणाले.

यावर रिप्लाय देताना डॉक्टर कराड यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच तुम्ही दाखवलेल्या ‘सेव आणि समर्पण’ या मार्गावरुनच मी जनतेची सेवा करत आहे, असंही कराड म्हणाले.

या प्रवाशाचा रक्तदाब कमी झाल्याने त्या फार घाम येत होता. मी त्याला कपडे काढण्यास सांगितले. त्याची छाती चोळली, त्याला ग्लुकोज दिल्यानंतर ३० मिनिटांनी या प्रवाशाला बरं वाटलं, असं कराड यांनी म्हटलं आहे.

प्रकृती खराब झालेल्या या प्रवाशाची मदत करण्यासाठी डॉक्टर कराड यांनी केंद्रीय मंत्र्यांसाठीचा प्रोटोकॉलही तोडला. मात्र त्यांनी वेळीच मदत केल्याने त्या प्रवाशाचा प्राण वाचला.

कराड यांचं संपूर्ण नाव डॉ. भागवत किशनराव कराड असं आहे. त्यांचा जन्म १६ जुलै १९५६ रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाले. त्यांनी एमबीबीएस, एम.एस.(जनरल सर्जरी), एम. सीएच(पेडियाट्रीक) या पदव्यांचं शिक्षण घेतलं आहे. कराड हे मूळचे लातूरचे आहेत. डॉ. कराड हे बालरोग शल्यचिकित्सक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhagwat karad doctor turned union minister helps passenger mid air what pm said scsg

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या