शेतकरी आंदोलनाचा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात परिणाम

नवी दिल्ली : केंद्राच्या तीन शेती कायद्यांच्या विरोधात सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदचा देशाच्या बहुतांश भागांत प्रभाव जाणवला नाही. मात्र निदर्शकांनी महामार्ग व प्रमुख रस्ते अडवून धरल्यामुळे हरियाणा, पंजाब व पश्चिम उत्तरप्रदेशातील जनजीवन विस्कळीत झाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या ३ वादग्रस्त कायद्यांना मंजुरी देण्यास एक वर्ष झाल्यानिमित्त ४० शेतकरी संघटनांची शीर्षस्थ संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने या बंदचे आवाहन केले होते.

उत्तर भारतात काही रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या.  बंदमुळे काही रेल्वेगाडय़ा उशीर धावत होत्या.  त्यातच राज्यांच्या सीमांवर  अडथळे आल्यामुळे प्रवाशांना बंदचा फटका बसला. जेथून दररोज हजारो लोक कामावर जातात, अशा प्रामुख्याने गुरुग्राम, गाझियाबाद व नॉयडा या शहरांसह दिल्ली- राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात याचा प्रभाव जाणवला.

 सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी आणि विरोधी काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी यांनी बंदला पाठिंबा दिलेल्या केरळमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. सर्व कामगार संघटना संपात सहभागी झाल्यामुळे राज्य परिवहन बससेवा बंद होती.

पश्चिम बंगालमध्येही डाव्या आघाडीने बंदला पाठिंबा दिला होता. कोलकात्यात निदर्शक एका ठिकाणी रेल्वेमार्गावर ठिय्या देऊन बसले.

राजधानी दिल्लीत ऑटोरिक्षा व टॅक्सी नेहमीप्रमाणे धावल्या आणि दुकानेही सुरू होती. मात्र प. उत्तरप्रदेशातील गाझीपूरलगतच्या शहराच्या सीमेवर शेतकऱ्यांनी वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी महामार्ग रोखून धरला. हरियाणातील सोनिपत आणि पंजाबमधील पतियाळा येथे शेतकऱ्यांनी लोहमार्गावर धरणे दिले. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी संपूर्ण बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांनी मोगा- फिरोझपूर व मोगा- लुधियाना राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले. हरियाणात सिरसा, फतेहाबाद व कुरुक्षेत्र येथील महामार्गावरील वाहने रोखली.

ऐतिहासिक प्रतिसादाचा दावा

नवी दिल्ली : आपण केलेल्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला २३ हून अधिक राज्यांमध्ये ‘अभूतपूर्व व ऐतिहासिक’ प्रतिसाद लाभल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) सोमवारी केला आणि कुठेही अप्रिय घटना घडली नसल्याचे सांगितले. ‘भारत बंदच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याच्या बातम्या मिळाल्या आहेत. बहुतांश ठिकाणी समाजाच्या विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले’, असे एसकेएमने एका निवेदनात सांगितले. राज्य सरकारे व राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिल्याचे त्यांनी कौतुक केले.

५० रेल्वेगाडय़ांना फटका

सोमवारच्या बंदमुळे सुमारे ५० रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बिघडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली, अंबाला व फिरोझपूर विभागांमध्ये २० हून अधिक ठिकाणी मार्ग रोखण्यात आले. यामुळे ५० गाडय़ा रखडल्या होत्या, असे उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.