scorecardresearch

केंद्राच्या पत्रामुळे ‘भारत जोडो’ यात्रेवरून कलगीतुरा; करोनाचे कारण देत यात्रा स्थगित करण्याची सूचना

भाजपच्या तीन खासदारांनी करोनाच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून ‘भारत जोडो’ यात्रा स्थगित करण्याची विनंती केली आहे.

केंद्राच्या पत्रामुळे ‘भारत जोडो’ यात्रेवरून कलगीतुरा; करोनाचे कारण देत यात्रा स्थगित करण्याची सूचना

नवी दिल्ली : भाजपच्या तीन खासदारांनी करोनाच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून ‘भारत जोडो’ यात्रा स्थगित करण्याची विनंती केली आहे. ही यात्रा शनिवारी दिल्लीत येणार असून यात्रेकरू आठ दिवसांची विश्रांती घेतील. ही सुट्टी संपल्यानंतर यात्रेच्या पुढील प्रवासाबाबत निर्णय घेतला जाणार असला तरी, केंद्राच्या सूचनेमुळे यात्रेवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

‘भारत जोडो’ यात्रा स्थगितीच्या सूचनेला काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे. दक्षिण भारताप्रमाणे उत्तरेतही यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने करोनाची भीती दाखवत केंद्राने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार नासीर हुसेन यांनी दिली. मात्र, ‘गांधी कुटुंबासाठी करोनाचे नियम नाहीत का? काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षांपेक्षाही या कुटुंबाला अधिक महत्त्व दिले जात असेल पण, त्यांनाही करोनासंदर्भातील र्निबध पाळावे लागतील’, असे प्रत्युत्तर केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. राजस्थानचा दौरा पूर्ण करून यात्रा भाजपशासित हरियाणामध्ये पोहोचली असून तीन दिवसांच्या प्रवासानंतर दिल्लीला पोहोचेल. त्यानंतर, ही यात्रा उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर या राज्यांत प्रवास करून श्रीनगरमध्ये अंतिमस्थळी संपेल.

भाजपचे खासदार पी. पी. चौधरी, निहाल चंद व देवजी पटेल या तिघांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांना मंगळवारी पत्र लिहून ‘भारत जोडो’ यात्रेमुळे राजस्थानमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दावा केला होता व यासंदर्भात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या पत्राची मंडाविया यांनी तातडीने दखल घेत, त्याचदिवशी राहुल गांधी यांना पत्र पाठवले. यात्रेमध्ये करोनासंदर्भातील र्निबधाचे कठोर पालन करावे, मुखपट्टी व विषाणूविरोधकांचा वापर करावा. तसेच, करोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनाच यात्रेत प्रवेश द्यावा. हे नियम पाळता येणार नसतील तर, सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन यात्रा स्थगित करावी, अशी सूचना मंडाविया यांनी पत्रात केली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेने शंभर दिवसांचा टप्पा पूर्ण केला आहे.

यात्रेच्या लोकप्रियतेचे केंद्राला वावडे- काँग्रेस</strong>

चिनी घुसखोरी, महागाई, बेरोजगारी अशा देशाला भेडसावणाऱ्या विषयांपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेला केंद्राकडून जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाच्या नियमांचे पालन केले होते का, असा सवाल लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांना राहुल गांधीची ही यात्रा आवडलेली नाही असे दिसते. लोक यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे यात्रेला केंद्राकडून विरोध केला जात आहे, असेही अधीर रंजन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या