Bharat Taxi Launch : दिल्लीत ‘भारत टॅक्सी’ हे अ‍ॅप अधिकृतपणे लाँच करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी या भारत टॅक्सीच्या सेवेची घोषणा केली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते या टॅक्सीची सेवा अधिकृत लाँच करण्यात आली आहे.

भारत टॅक्सीच्या सेवेमुळे प्रवासी आणि चालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. भारत टॅक्सीच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित, परवडणारी आणि चांगली कॅब सेवा देण्याचा हा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रात ‘भारत टॅक्सी’ या अ‍ॅपकडे एक देशी पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

देशभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवेतील ओला, उबर कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या अनुषंगाने केंद्रीय सहकार विभागाच्या पुढाकाराने देशात पहिल्यांदाच सहकारी तत्त्वावर ‘भारत टॅक्सी’ ही सेवा आता सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भारत टॅक्सी ही सेवा उबर आणि ओलाला टक्कर देऊ शकते.

भारत टॅक्सी दिल्लीत अधिकृतपणे लाँच झाली असून आता ऑनलाईन ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रात किंवा भारतातील कॅब-हेलिंगमध्ये मोठा बदल होणार आहे. या भारत टॅक्सी सेवेला भारत सरकारचं पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे. भारत टॅक्सी ही सेवा लवकरच देशभरातील सर्व राज्ये आणि शहरांमध्ये विस्तारण्याची शक्यता आहे.

भारत टॅक्सी प्रवाशांना कशी सेवा देणार?

भारत टॅक्सी ही ॲप आधारित टॅक्सी सेवा आहे. ओला, उबर या कंपन्यांसारखी पण प्रवाशांना परवडणारी सेवा भारत टॅक्सीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. भारत टॅक्सी एक मोबाईल आधारित कॅब बुकिंग प्लॅटफॉर्म असणार आहे. ओला, उबर या सारख्या कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर्स सारखंच स्मार्टफोनवरून ऑपरेट करता येणार आहे.

भारत टॅक्सीच्या किमती खासगी कंपन्यांपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत स्वस्त असण्याची शक्यता आहे. तसेच खासगी कंपन्यांमध्ये ड्रायव्हर्सना जास्त टक्के कमिशन द्यावं लागतं. मात्र, भारत टॅक्सीमध्ये सुरुवातीला झिरो कमिशन मॉडेल असेल. त्यामुळे या भारत टॅक्सीच्या ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईचा जवळपास ८० ते १०० टक्के लाभ मिळू शकतो.

प्रवाशांना काय फायदे मिळणार?

-भारत टॅक्सीमध्ये भाडे वाढणार नाही.
-पारदर्शक भाडे दर असतील.
-४ किमी पर्यंत किमान ३० रुपये आणि पुढील अंतरासाठी निश्चित दर असतील.
-एकाच अ‍ॅपवर बाईक टॅक्सी, ऑटो आणि कार उपलब्ध असतील.