उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर आता उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांची निवड करण्यात आलेली आहे, ते खटीमा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. ४५ वर्षीय धामी हे उत्तरखंडचे सर्वात तरूण मुख्यमंत्री असणार आहेत.

आज (शनिवार) भाजपा आमदारांच्या झालेल्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वानुमते निवड केली गेली. अगोदर ठरल्यानुसार आजच धामी यांचा शपविधी होणार होता. मात्र नंतर या कार्यक्रमात बदल करण्यात आला व आता उद्या (रविवार) त्यांचा शपथविधी असणार आहे.

तर, ”माझ्या पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला, माजी सैनिकाच्या मुलाला ज्याचा जन्म पिथौरगड येथे झाला त्याला राज्याची सेवा करण्यासाठी नेमलं आहे. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी एकत्र काम करू. कमी कालावधीतही मी इतरांच्या सहकार्याने जनतेच्य सेवा करण्याचं आव्हान स्वीकरतो आहे.” अशी प्रतिक्रिया पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या निवडीनंतर दिली आहे.

याचबरोबर पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याचे जाहीर होताच, त्यांची पत्नी गीता धामी यांनी देखील विशेष प्रतिक्रिया दिली आहे.  ”मला पक्षाचे हायकमांड पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा व खटीमा मतदार संघातील जनतेचे आभार मानायचे आहेत. ते (पुष्कर सिंह धामी) हे मध्यवर्गीय कुटुंबातून आले आहेत आणि त्यांना जनतेच्या समस्यांची जाण आहे.” असं पुष्कर सिंह धामी यांची पत्नी गीता धामी यांनी म्हटलं आहे.

आम्ही या निर्णयाबद्दल आनंदी आहोत. आम्हाला तरूण नेतृत्व मिळालं आहे. आम्ही २०२२मधील विधानसभा निवडणूक मोठ्या बहुमताने जिंकू. असा विश्वास भाजपाचे खासदार अजय भट्ट यांनी, पुष्कर सिंह धामी यांच्या निवडीनंतर व्यक्त केला आहे.