धन्य ती माता अन् धन्य तो भीम

भीमाबाई मोठी करारी, कर्तबगार अन् धर्मपरायण स्त्री होती. कुलदीपक पुत्र प्राप्त व्हावा म्हणून तिने दान, व्रतवैकल्ये, आराधना नि धार्मिक कृत्ये केली होती.

– मिलिंद मानकर

भीमाबाई मोठी करारी, कर्तबगार अन् धर्मपरायण स्त्री होती. कुलदीपक पुत्र प्राप्त व्हावा म्हणून तिने दान, व्रतवैकल्ये, आराधना नि धार्मिक कृत्ये केली होती. 1891 च्या 14 एप्रिलला महू छावणीत तपोनिष्ठ भीमाबाईला पुत्ररत्न प्राप्त झाले. तो पुत्ररत्न म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. भीमाला जन्म देणार्या या थोर मातोश्रीच्या स्मृतीगंधाला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने उजाळा.

महाकारुणिक तथागत बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या महामाया, राणी सुभद्रांगी आणि भीमाबाई श्रेष्ठ, आदर्श माता होत्या. बुद्धाच्या जन्माच्या वेळी असित मुनी म्हणाले होते, ‘हे राजन ! जर तो मनुष्य जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक सम्बुद्ध होईल.’ अशोकाच्या शरीरावरची राजचिन्हे पाहून वत्सजीव उद्गारले, ‘हा मोठा नामांकित सम्राट होणार.’ आधुनिक जगात एका करुणाहृदयी साधू महात्म्याने बाबासाहेबांविषयी असेच सूचक विधान केले होते.

भीमाबाईचे घराणे लष्करी बाण्याचे म्हणून प्रसिद्ध होते. ठाण्याजवळील मुरबाड गावातील कित्येक महत्वाकांक्षी तरुणांनी लष्करात प्रवेश करून मोठा पराक्रम गाजविला होता. भीमाबाईचे वडील धर्माजी आणि चुलते सात भाऊ मिळून लष्करात सुभेदार-मेजरच्या पदापर्यंत पोहोचले होते. बाबासाहेबांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार असताना त्यांची मेजर धर्माजी पंडित मुरबाडकर यांच्याशी ओळख झाली. रामजीचे व्यक्तिमत्त्व, धार्मिकता आणि सुशील घराणे पाहून धर्माजींनी आपली मुलगी भीमाबाई हिचा विवाह रामजीशी केला.

भीमाबाई मोठी करारी आणि कर्तबगार त्री होती. बोलघेवडी, स्वाभिमानी, निश्चयी अन् धर्मपरायण होती. वर्णाने गोरी होती. डोळे टपोरे नि पाणीदार होते. केस कुरळे, कपाळ रुंद अन् नाक किंचित ठुसके होते. रामजीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे माहेरच्या मंडळींची थोडी नाराजी होती. भीमाबाईने मात्र आनंदाने माहेरच्या मंडळींना प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, ‘दागिने सुकत घालण्याएवढी श्रीमंती येईल तेव्हाच मी माहेरी येईल.’ रामजींच्या अल्प पैशावर प्रपंच चालविणे कठीण असल्यामुळे भीमाबाई सांताक्रूझ येथे रस्त्यात खडी टाकण्याचे काम करायच्या. ती व्यवहारदक्ष असल्यामुळे बिकट परिस्थितीसुद्धा कोंडय़ाचा मांडा करून मानाने जगत होती.

पुण्यातील पंतोजी शाळेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन रामजी शिक्षक झाले आणि हळूहळू लष्करी छावणीतील शाळेत ते मुख्य शिक्षक झाले. मुख्याध्यापकाचे काम त्यांनी जवळजवळ चौदा वर्षे केले. त्यांच्या या सेवेचे चीज होऊन शेवटी त्यांना सुभेदार-मेजर पदापर्यंत बढती मिळाली. अस्पृश्य देखील आदर्श शिक्षक होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीने सिद्ध करून दाखविले. पतीच्या पदात आणि प्राप्तीत वाढ झाल्यामुळे भीमाबाई माहेरी जाणे-येणे मोठय़ा सन्मानाने करू लागल्या. रामजींचा संसार संपत्ती नि उच्च संस्काराने उजळून निघाला. भीमाबाई बहु प्रसवता होत्या. त्यातलाच विश्वाला गवसणी घालणारा भीम होता. रामजींना पत्नीच्या आजाराविषयी काळजी वाटे. घरातील आगत-स्वागत, बैठका, पतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या बदल्या यांनी भीमाबाई अगदी मेटाकुटीस आल्या होत्या. कठोर व्रतवैकल्ये, पूजाअर्चा नि वैद्यकीय निदान न झालेली शारीरिक व्यथा यांचीही त्यात भर पडली होती. त्यामुळे भीमाबाईंची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली होती.

रामजींची निरनिराळ्या लष्करी छावण्यात बदली होता होता शेवटी मध्य प्रदेशात महू येथील लष्करी छावणीतील शाळेत त्यांचे आसन स्थिरावले. येथील वास्तव्यात एक मोठी संस्मरणीय अशी घटना घडली. बैरागी बनलेल्या रामजीच्या एका चुलत्याला अनेक वर्षे ठावठिकाणा नव्हता. योगायोगाने तो बैराग्यांच्या एका जथ्यातून महूला आला होता. तो बराच म्हातारा झाला होता. त्याला भीमाबाईने रस्त्यात पाहिले. ती नदीवर धुणे घेऊन चालली होती. ती माघारी परतली. तिने सुभेदारास बातमी दिली. सुभेदार बैराग्याकडे गेले. त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. बैराग्याने ते नाकारले आणि उभय पती-पत्नीला आशीर्वाद देत म्हणाले, ‘आपल्या कर्तृत्वाने इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर करील, असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल.’

स्वभावाने धार्मिकवृत्तीचे असल्याने रामजी व भीमाबाई या कृपा प्रसादिक वचनाने भारावून गेले. कुलदीपक पुत्र प्राप्त व्हावा म्हणून दान, व्रतवैकल्ये, आराधना नि धार्मिक कृत्ये भीमाबाई करू लागल्या. 1891 च्या 14 एप्रिलला मध्य प्रदेशातील महू छावणीत तपोनिष्ठ भीमाबाईला पुत्ररत्न प्राप्त झाले. 14 व्या रत्नाचे नाव सुभेदारांनी ‘भीम’ असे ठेवले. नूतन बाळाचे पाळण्यातील नाव जरी भीम होते तरी घरी त्याला भिवा म्हणत. भीवा आपल्या आईच्या सौंदर्याचा व गुणांचा धनी होता. त्यामुळेच सर्वात शेंडेफळ असूनही त्याला तिचे नाव देण्यात आले होते. बारशासाठी जमलेल्या बाया म्हणाल्या, ‘ह्यो मुलगा भीमावानी लठ्ठमुठ्ठ आन् पराक्रमी होनार., आन् दिसत्योय बी आपल्या आईवानी – भीमाबाईवानी.’

सातारा शहरात सुभेदार रामजीचे वास्तव्य होते. भीमाबाई स्वभावाने कडक होत्या. संसारात दक्ष होत्या. भीमाबाईमुळे रामजींना घरातला प्रपंच विशेष पहावा लागत नसे. इवलासा भीवा शाळेत जात होता.. भीवाला शाळेत जाऊन थोडे दिवस झाल्याबरोबर सुभेदारांची सातार्याहून बदली झाली. इकडे भीमाबाईचा आजार बळावला. त्या अंथरुणाला खिळल्या. आहार कमी झाला. ही परिस्थती रामजींना पत्राने कळविण्यात आली. ते गोरेगावाहून साताराला आले. तीन दिवसानंतर भीमाबाई गंभीर झाल्या. सर्व मुले बिछान्याभोवती गोळा होऊन ओक्साबोक्सी रडत होती. चौथ्या दिवशी सकाळी भीमाबाईने मुलांना जवळ बोलावले. त्यांना डोळे भरून पाहिले. भीवाच्या पाठीवरून हात फिरविला अन् भीमाबाईने शेवटचा श्वास सोडला.

बाबासाहेबांचे आईवर अतिशय प्रेम होते. ते जेव्हा सातारा शहरात सामाजिक, राजकीय, कोर्टाच्या कामासाठी येत त्यावेळी आपल्या आईच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घ्यायचे. जड अंतःकरणाने फुलाचे हार घालायचे. आईच्या आठवणीने लहान मुलासारखे रडायचे. बाबासाहेब 1937 च्या सुमारास साताराला आले होते. मोटारीतून उतरताच फुलाहाराची करंडी हाती घेऊन रस्ता सोडून उजव्या बाजूला आडरानाला निघाले. मग सर्व कार्यकर्ते मोटारीतून उतरून त्यांच्या मागोमाग निघाले. ‘बाबासाहेब आपल्या मातोश्रीच्या दर्शनाला चालले होते.’ बाबासाहेबांच्या मनःचक्षूपुढे फक्त मातोश्रीची मूर्ती दिसत होती. मातृप्रेम त्यांच्या हृदयात दाटून आले होते. मातेच्या स्मृतीने ते गहिवरले. मातृभक्तीने फुलाहारांची श्रद्धांजली वाहिली. अश्रूंनी आपलं प्रेम मातेच्या चरणी समर्पण केलं. अदृश्य मातेचा शुभाशीर्वाद घेतला अन् आपल्या सामाजिक ध्येयपूर्तीसाठी निघून गेले…

(मिलिंद मानकर, नागपूर, बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे संग्राहक)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bheemabai mother of babasaheb was great lady

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या