जवान शहीद होण्यासाठीच लष्करामध्ये भरती होतात, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे ग्रामविकासमंत्री भीमसिंह यांनी गुरुवारी केले. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खडसावल्यानंतर भीमसिंह यांनी लगोलग आपल्या प्रतिक्रियेबद्दल माफीही मागितली.
पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले. या पैकी चार जवान हे बिहारमधील आहेत. बिहार सरकारकडून शासकीय इतमामात या जवानांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शहीद जवान प्रेमनाथ यांच्या अंत्यसंस्कारावेळी बिहार सरकारमधील एकही मंत्री तिथे उपस्थित नव्हता. छप्रामध्ये झालेल्या अंत्यसंस्कारावेळी तेथील रहिवासी असलेले राज्याचे विज्ञानमंत्री गौतमसिंह हे देखील तिथे पोहोचले नाहीत. यावरून पत्रकारांनी भीमसिंह यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी त्यांनी जवान हे शहीद होण्यासाठीच असतात. सैन्यातील नोकरी शहीद होण्यासाठीच असते, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली.