कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्यावरून नजरकैदेत असणाऱ्या गौतम नवलखांची नजरकैदेतून मुक्तता होणार आहे. दिल्ली हायकोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय रद्द ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने नजरकैदेत असलेल्या पाचही जणांची नजरकैद चार आठवड्यांसाठी गेल्याच आठवड्यात वाढवली. मात्र त्याचवेळी ज्यांना नजरकैद संपण्यासाठी अर्ज करायचा आहे ते संबंधित कोर्टात अर्ज करू शकतात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.

महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेच्या संदर्भात या वर्षी २८ ऑगस्टला पाच जणांना अटक केली होती. त्यात तेलगू कवी राव, कार्यकर्ते व्हेरनॉन गोन्सालविस, अरुण फरेरा, कामगार संघटनेच्या नेत्या सुधा भारद्वाज, नागरी हक्क कार्यकर्ते नवलाखा यांचा समावेश होता. आता गौतम नवलखांची नजरकैदेतून सुटका करण्यात येणार आहे.

कोण आहेत गौतम नवलखा?

गौतम नवलखा हे दिल्लीत राहणारे पत्रकार आहेत. इकॉनॉमिक एंड पॉलिटिकल वीकली चे ते संपादकिय सल्लागारही आहेत. सुधा भारतद्वाज आणि त्यांनी कलम १९६७ रद्द करण्याची मागणी केली होती. जम्मू काश्मीरमधील मानवाधिकारांबाबत त्यांनी बरेच लिखाण केले आहे.