नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा संकुलाला लागून असलेल्या दर्ग्याच्या जमिनीवर मुस्लिांना शुक्रवारी नमाज पठण करता येईल, अशी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जिली. दर शुक्रवारी दुपारी १ ते ३ या दरम्यान मुस्लिमांना नमाज पठण करू दिले जाईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. मात्र, या निकालामुळे मुस्लीम समुदाय आणि राज्य सरकारने परस्पर सहमतीने शुक्रवारच्या नमाज पठणासाठी अन्य जागांचा शोध घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी १४ जुलैला न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले होते की, या खटल्याचा निकाल लागेपर्यंत नमाज पठणासाठी संकुलाच्या जवळची खुली जागा उपलब्ध करून दिली जावी. मात्र, जिल्हा प्रशासन १.३ किमी अंतरावरची जागा देत असल्याचे नमूद करत हाजी मुनीर अहमद यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.