मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे लग्न समारंभादरम्यान पोलिसांनी मंडपातूनच वराला अटक केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे आनंदाचा समारंभ काही क्षणातच गुन्हेगारी नाट्यात बदलला. लग्नाच्या आधीच पोलिसांनी वराला ताब्यात घेतल्याने पाहुण्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

मंडपातून अटक

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पोलिसांचे पथक लग्नस्थळी पोहोचले आणि वर असलेल्या आकाश नीलकंठ उर्फ ‘भूरा’ याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो स्थानिक पातळीवर ‘इलिगल गँग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हेगारी गटाचा कथित म्होरक्या आहे. त्याच्यासोबत राजमजी ठाकूर, अभिषेक उपाध्याय, अभिषेक मीना, नीरज खांगे आणि अमित ओसवाल यांनाही पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वधू पोहचली पोलीस ठाण्यात

या घटनेनंतर काही तासांनी वधू सीमा थेट कोह-ए-फिजा पोलिस ठाण्यात पोहोचली. तिच्या हातावर मेहंदी आणि चेहऱ्यावर हळदी असतानाच तिने पोलिसांसमोर हताश विनंती केली. “साहेब, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याने केलेल्या गुन्ह्यांबद्दल मला काहीच माहिती नव्हती. घरी पाहुणे वाट पाहत आहेत. हळदी आणि इतर सर्व विधी झाले आहेत,” असे सांगत तिने वराला किमान दोन तासांसाठी सोडण्याची विनंती केली.

पोलिसांनी ही मागणी नाकारल्यानंतर तिने आणखी एक विनंती केली. “जर त्याला सोडता येत नसेल, तर लग्नाची विधी किमान पोलिस कोठडीत तरी करू द्या,” असेही तिने सांगितले. मात्र पोलिसांनी या विनंतीलाही नकार दिला.

‘इलिगल गँग’चा म्होरक्या

तपासकर्त्यांच्या माहितीनुसार, ‘इलिगल गँग’ नावाने ओळखला जाणारा हा गट २०१८ पासून शहरात सक्रिय आहे. वाजपेयी नगर परिसरातील सुमारे ५० हून अधिक तरुण या गटाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या टोळीतील अनेकांनी त्यांच्या मानेवर ‘इलिगल’ असा शब्द गोंदवला असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

आकाश उर्फ भूरा याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. १८ मार्च २०२४ रोजी भाजप युवा मोर्चाचे मंडळ उपाध्यक्ष सुरेंद्र कुशवाह यांच्या हत्येप्रकरणातही तो मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात तो सुमारे १८ महिने तुरुंगात होता आणि चार महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.

दरम्यान, सीमा आणि आकाश हे गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाची तयारीही काही आठवड्यांपासून सुरू होती. मात्र लग्नाच्या दिवशीच वराला अटक झाल्याने संपूर्ण कार्यक्रमात गोंधळ उडाला.