१०० रुपयांचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलाला पळवून नेऊन त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये समोर आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या हत्येमागे मृत मुलाच्या अवयवाची बेकायदेशीर विक्री करून २ कोटी रुपये कमावण्याचा कट केल्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
ही घटना ऑगस्टच्या सुरुवातीला घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलगा ६ ऑगस्ट रोजी इक्बाल मैदान परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच १० ऑगस्ट रोजी छोटा तलाव परिसरातील धोबीघाटजवळ त्याचा मृतदेह आढळला.
डॉक्टर असल्याचे भासवून अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढले
पोलिसांच्या तपासात या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवल्याचे समोर आले आहे. तो तीन अल्पवयीन मुलांच्या संपर्कात आला आणि त्यांना अवयव विक्रीच्या योजनेत सहभागी करून घेतले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी सुमारे महिनाभरापूर्वी या अल्पवयीन मुलांच्या संपर्कात आला होता. तो डॉक्टरसारखे कपडे घालून त्यांना भेटत असे. पोलिसांच्या दाव्यानुसार, त्याने आपल्या मोबाईलवर अल्पवयीन मुलांना एक व्हिडिओ दाखवला आणि एखाद्या किशोरवयीन मुलाला लक्ष्य करून त्याच्या अवयवाची विक्री केल्यास मोठी रक्कम मिळू शकते, असे सांगितले. त्याने त्या मुलांना २ कोटीपर्यंत कमाईचे आमिष दाखवले आणि १५ ते १६ वर्षे वयोगटातील मुलाची गरज असल्याचे सांगितले.
१०० रुपये देण्याचे आमिष
त्या १७ वर्षीय मुलाला १०० रुपये देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याला इक्बाल मैदान परिसरातून नेल्यानंतर नेमके काय घडले, याचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलाची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याच्या शरीरातील एक अवयव काढल्याचा संशय आहे. तो अवयव विकण्यासाठी ग्राहक शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ग्राहक न मिळाल्याने तो अवयव तलावात फेकून दिल्याचा आरोप आहे.
मोठ्या अवयव तस्करीच्या रॅकेटचा तपास
गुन्हा घडत असताना मुख्य सूत्रधार अल्पवयीन आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आता हत्येचा नेमका कट, अवयव काढण्यामागील उद्देश, पैशांचे व्यवहार आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करत आहेत. या घटनेनंतर पोलीसांकडून आरोपींचा एखाद्या मोठ्या बेकायदेशीर मानवी अवयव तस्करीच्या नेटवर्कशी संबंध आहे का? याचा शोध घेतला जात आहे.
