Bhopal Minor Gang-Raped : भोपाळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ब्लॅकमेल आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आता याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. भोपाळमध्ये एका अकरावीच्या मुलीवर अनेक वेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिचे व्हिडिओ काढण्यात आले आणि तिला अनेक दिवस ब्लॅकमेल करण्यात आले, असं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं होतं. या चौकशीसाठी एसआयटी पथकात चार सदस्यांचा समावेश आहे. या पथकाकडून या आरोपींनी इतर महिलांनाही लक्ष्य केलंय का? हा कोणत्या कटाचा भाग आहे का? आदी सर्वांगीण बाबींनी चौकशी करणार आहेत.
भोपाळ सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती
शाहपुरा येथील एका प्रतिष्ठित शाळेत अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची एका मित्रामार्फत औसाफ अली खान नावाच्या तरुणाशी ओळख झाली. औसाफने विद्यार्थिनीला मैत्रीचे आमिष दाखवले आणि तिला गाडीवर घेऊन जाण्याच्या बहाण्याने खानुगावच्या एका निर्जन भागात नेले. तिथे त्याने तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला. ओसाफचा मित्र माझ खान देखील तिथे होता. त्याने अंधारात गाडीबाहेर लपून विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ शूट केला. या घटनेनंतर, आरोपीने विद्यार्थिनीला बदनामीची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल केल्यानंतर चार वेगवेगळ्या कारमध्ये तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. त्यांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून १ लाख रुपयांची रक्कम मागितली.
मुलीने कसे तरी त्यांना ४०,००० रुपये दिले, पण आरोपींचा क्रूरपणा कमी झाला नाही. जेव्हा विद्यार्थिनीने आरोपीला ब्लॉक केले तेव्हा ओसाफने तो खाजगी व्हिडिओ तिच्या मैत्रिणींना पाठवला आणि तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी व प्रार्थना करण्यासाठी दबाव टाकू लागला, असंही वृत्त समोर आलं आहे.
आरोपींना कशी अटक करण्यात आली?
व्यथित झालेल्या विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबाला तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. त्यानंतर हिंदू संघटनांच्या मदतीने २ फेब्रुवारी रोजी पोलीस तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, धर्म स्वातंत्र्य कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई केली. तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी औसाफ आणि त्याचा साथीदार माझ खान याला अटक केली. या संपूर्ण घटनेत जिम मालक माझ खानची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून सियाझ, स्विफ्ट, होंडा सिटी आणि थार यासारख्या कार जप्त केल्या आहेत. या गाड्यांची एकूण किंमत अंदाजे ७० लाख रुपये आहे.
जेव्हा आरोपी ओसाफला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले. या घटनेशी संबंधित संतप्त झालेल्या वकिलांनी आरोपीला घेरले आणि मारहाण केली. या मारहाणीत आरोपीला वाचवण्याकरता पोलिसांना मध्ये पडावे लागले. शिवाय, एसआयटी टीम आता अल्पवयीन मुलीची चौकशी करणार असूनआरोपीचे इतर मित्रही या घृणास्पद कृत्यात सहभागी होते का किंवा त्यांना व्हिडिओबद्दल माहिती होती का याचाही तपास पोलीस करत आहेत.

