Bhopal Nishatpura Murder Case : भोपाळमधील निशातपुरामधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित प्रियकराने त्याच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केली आणि हत्येनंतर तिचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा करण्यास सुरूवात केली आहे.
नेमकं काय घडलं?
निशातपुरा परिसरातील एका लव्हस्टोरीचा भयानक शेवट झाला आहे. एका रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमधून गुरुवारी संध्याकाळी ३३ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. इन्स्टाग्रामवरून सुरू झालेली लव्हस्टोरी शेवटी विश्वासघात आणि हत्येची कहाणी ठरली. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं.
वृत्तानुसार, पीडितेची ओळख सिया अशी झाली असून ती महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होती. पोलिसांच्या माहितीनुसार, तिचा विवाहित प्रियकर समीर याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोमवारी तिचा गळा दाबून खून केला. तसेच त्यानंतर तिचा मृतदेह एका लोखंडी पेटीत भरला आणि घराजवळील सेप्टिक टँकमध्ये टाकून दिला.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी सिया आणि समीर या दोघांचं इन्स्टाग्रामवरून प्रेम जुळलं. त्यानंतर सिया ही तिचं घर सोडून तीन महिन्यांपूर्वी भोपाळला समीरबरोबर राहायला गेली होती. मात्र, तिथे गेल्यानंतर तिला धक्का बसला. समीर आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुलेही होती.
पण तरीही ती त्याच्या घरात राहू लागली. मात्र, त्यानंतर त्यांच्यात दररोज वाद सुरू झाले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, त्या दोघांत वारंवार वाद होऊ लागले आणि घरगुती अशांतता वाढत गेली. त्यानंतर समीरची आधीची पत्नी वारंवार वाद होत असल्याने तिच्या माहेरी निघून गेली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी सिया आणि समीरमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबला आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी समीरने त्याचा भाऊ, आई आणि बहिणीची मदत घेत तिचा मृतदेह एका लोखंडी पेटीत भरला आणि रात्री त्याच्या घराजवळील रिकाम्या जागेतील सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी त्या टाकीतून दुर्गंध येत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. त्यानंतर त्यांना सेप्टिक टँकमध्ये एक लोखंडी पेटी तरंगताना आढळून आली.
यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि टाकीची तपासणी केली असता त्या पेटीत एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची ओळख तिच्या हातावरील टॅटूवरून पटवली. दरम्यान, आरोपी समीर फरार झाला असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली आहे.
