Bhopal Sex Racket Case involving forced conversion and rape: मध्यप्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यात दोन वेगवगेळ्या तक्रारींचा तपास करत असताना एक भयानक प्रकरण समोर आले आहे. दोन सख्ख्या बहिणींकडून भोपाळमध्ये सेक्स आणि धर्मांतराचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडची २१ वर्षीय आणि भोपाळमधील एका ३० वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीचा तपास करत असताना हे रॅकेट उघड झाले. नोकरीचे आमिष दाखवणे, नंतर अंमली पदार्थ देऊन बलात्कार आणि बळजबरीने धर्मांतर करण्यासारखे धक्कादायक प्रकार घडले आहेत. पोलिसांनी आफरीन आणि अमरीन या दोन बहिणींना अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार

भोपाळच्या अब्बास नगर येथे एका झोपडीत राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी नुकताच भोपाळच्या उच्चभ्रू वस्तीत एक आलिशान बंगला विकत घेतला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, अवैध मार्गाने कमवलेल्या पैशातून ही वास्तू विकत घेण्यात आली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरनुसार, आरोपी बहिणी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील मुलींना लक्ष्य करत असत. त्यांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून चांगली जीवनशैली मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत.

मुलींना कसे फसवले गेले?

२१ वर्षीय पीडित तरूणीने सांगितले की, २०२५ मध्ये तिचा संपर्क अमरीनशी झाला होता. अमरीनने तिला अब्बास नगरमधील तिच्या घरी नेले होते. तिथे तिचा कथित भाऊ बिलालने चहामध्ये मादक पदार्थ मिसळून दिला. शुद्ध हरपल्यानंतर बिलालने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पुढच्याच महिन्यात अमरीनने तिला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अहमदाबादला नेले. तिथेही यासीर नावाच्या इसमाने याचप्रकारे बलात्कार केला. तसेच अमरीनचा साथीदार चंदन यादवनेही ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली.

पीडितेने पुढे म्हटले की, जेव्हा जेव्हा तिने या प्रकारांना विरोध केला. तेव्हा तिचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ दाखवून तिला धमकविण्यात आले. पुढे तिला छोटे कपडे घालून पबमध्ये नेण्यात येत होते आणि तिथे पुरूषांबरोबर संबंध ठेवण्यास दबाव टाकला जात होता. यावेळी तिला मादक पदार्थ घेण्यास भाग पाडले जात होते, असेही पीडितेने म्हटले.

पुढे काही दिवसांनी तिला धर्मांतर करण्याची बळजबरी करण्यात आली. या प्रकाराला कंटाळून जानेवारी महिन्यात पीडितेने पळ काढला आणि छत्तीसगडमधील घर गाठले. तिथून २२ फेब्रुवारी रोजी भोपाळमध्ये परतल्यानंतर बागसेवानिया पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल केली.

दुसऱ्या प्रकरणातही अशीच तक्रा प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. अमरीनच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेनेही अशाच प्रकारची तक्रार केली होती. तिलाही मादक पदार्थ देऊन बिलाल, यासिर आणि चंदन यांनी लैंगिक अत्याचार केले होते. याचे व्हिडीओही पीडितेने पोलिसांना दिले.

या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सख्ख्या बहिणी आणि तिघांवर गुन्हा दाखल केला.