मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एका शासकीय शाळेच्या वसतिगृहात जेवणात पाल पडलेली बटाट्याची भाजी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे दूषित अन्न खाल्ल्यामुळे सुमारे १३ विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने जयप्रकाश (जेपी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती शाळा प्रशासन व डॉक्टरांनी दिली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
कॅन्टीन चालकाच्या निष्काळजीपणामुळे प्रकार?
भोपाळमधील रातीबड परिसरातील श्रमोदय विद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडली. सहावी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणात बटाट्याची भाजी वाढण्यात आली होती. याच भाजीमध्ये पाल आढळल्याचा दावा पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे, मुलांची प्रकृती बिघडल्यानंतरही शाळा किंवा वसतिगृह प्रशासनाने आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज आल्यानंतर आपण तातडीने रुग्णालयात धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापकांकडून कारवाईचा इशारा
याप्रकरणी श्रमोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रत्ना दुबे यांनी हा प्रकार कॅन्टीन चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे सांगितले. १३ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची पुष्टी करत त्यांनी स्वतः जेपी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच, संबंधित कॅन्टीन चालकाला नोटीस बजावण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांकडून तपास सुरू
जेपी रुग्णालयातील डॉक्टर रत्नेश जैन यांनी सांगितले की, उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. वैद्यकीय पथकाने वेळीच उपचार केल्याने सर्व मुले धोक्याबाहेर आहेत. दुसरीकडे, पालकांच्या तक्रारीवरून रातीबड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून, अहवालानुसार कॅन्टीन चालकाविरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस ठाण्याचे प्रभारी रामबाबू सिंह यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे निवासी शाळांमधील जेवणाचा दर्जा, स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
