Bhopal Gaming Addiction Suicide Case : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. ‘भारत सिटी सोसायटी’मध्ये तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या तिघींनाही ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. याच गेममुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जातंय. दरम्यान अशीच एक आणखी एक घटना समोर आली आहे.
नेमकी काय घटना समोर आली?
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मोबाइल गेमच्या सवयीने १४ वर्षांच्या मुलाचं आयुष्य हिरावून घेतलं आहे. मोबाइल गेममुळे या मुलाने आयुष्य का संपवलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. १४ वर्षांच्या या मुलाचे आई-वडील तेरावा असल्याने नातेवाईकांकडे गेले होत. परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे हे त्यांनी पाहिलं. ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील तीन बहिणींच्या आत्महत्येप्रमाणेच आहे. भोपाळमध्ये या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे आणि हळहळही व्यक्त केली जाते आहे.
अंश असं आयुष्य संपवलेल्या मुलाचं नाव
भोपाळमध्ये ज्या मुलाने आत्महत्या केली तो १४ वर्षांचा होता. पोलिसांनी त्याच्या खोलीतून त्याचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. तसंच या ठिकाणी पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट मिळाली नाही. अंश असं या मुलाचं नाव आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ब्लू व्हेल हा गेम अंशला खेळायला आवडत होता. त्यातल्या टास्क पूर्ण करता करता त्याने आयुष्य संपवलं असं कुटुंबीयांचं मत आहे. दरम्यान अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अंशच्या कुटुंबीयांचं म्हणणं पोलीस नोंदवून घेत आहेत. Ndtv ने हे वृत्त दिलं आहे.
अंशच्या मामाने काय सांगितलं?
अंशचे मामा भोला यांनी सांगितलं की अंशच्या आजोबांच्या अकाऊंटमधून फ्री फायर गेमसाठी २८ हजार रुपये कापले गेले होते. याच कारणावरुन कुटुंबाने अंशकडून मोबाइल काढून घेतला होता. मोबाइल वापरु नकोस अशी ताकीद त्याला देण्यात आली. ज्यादिवशी त्याने टोकाचं पाऊल उचललं त्यादिवशी तो फ्री फायर गेम खेळत होता असंही मामाने सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचे सगळे पैलू तपासत आहेत.
‘कोरियन लव्ह’ गेम काय आहे?
‘कोरियन लव्ह’ हा गेम कोरियन पॉप कल्चर (के-पॉप), के-ड्रामा आणि व्हर्च्युअल डेटिंग थिम्सवर आधारित ऑनलाइन टास्क देणारा गेम आहे. हे गेम्स मोबाईल ॲप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चालतात, जिथे खेळाडू ‘व्हर्च्युअल लव्हर’ किंवा अज्ञात वापरकर्त्यांशी संवाद साधतात. हे अज्ञात लोक कोरियन शैलीत रोमँटिक मेसेज पाठवतात आणि रोजचे काही टास्क देतात. सुरुवातीच्या टप्प्यात ही कामे निरुपद्रवी वाटतात. सुरुवातील सतत चॅटिंग करणे, स्वतःचे फोटो पाठवणे किंवा मेसेज लिहिणे यांसारखे टास्क दिले जातात. कालांतराने हे टास्क अधिकाधिक वैयक्तिक आणि टोकाचे होत जातात. या गेमच्या काही टास्कमध्ये स्वतःला इजा करून घेण्यास प्रवृत्त केले जाते आणि शेवटचा टास्क मृत्यूशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

