Bhopal Tragedy : मध्य प्रदेशातल्या भोपाळमधली एक घटना समोर आली आहे ज्यामुळे कुणाचंही काळीज पिळवटून निघेल. आठ वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याने वडील इतके गर्भगळीत झाले की त्यांचा हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. भोपाळ या ठिकाणी रॉयल फार्म विला नावाची सोसायटी आहे. त्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकी काय घटना घडली?

रॉयल फार्म विला या इमारतीतल्या फ्लॅट क्रमांक ३०७ ऋषीराज भटनागर राहात होते. सोमवारी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. साधारण रात्री १० वाजण्याचा सुमारास या भागात वेगाने वारे वाहू लागले. त्यामुळे या कॉलनीतले लाईट गेले. लिफ्टने घरी जा असं लाईट जाण्यापूर्वी ऋषिराज यांनी त्यांच्या ८ वर्षांच्या मुलाला सांगितलं होतं. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा देवांश लिफ्टमध्ये गेला आणि लिफ्टने घरी चालला होता, त्याचवेळी लाईट गेले आणि लिफ्ट थांबली. हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला आणि बाबा, मला वाचवा म्हणू लागला. लिफ्टमध्ये आपला मुलगा अडकला हे ऋषिराज यांना लगेचच समजलं. त्यांनी लिफ्ट सुरु होते आहे का? याचे आणि त्याला बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले.

ऋषिराज यांचा मृत्यू कसा झाला?

पुढच्या तीन ते चार मिनिटांत लाईट आले. लिफ्ट सुरु झाली आणि देवांश बाहेरही आला. पण ऋषिराज बेशुद्ध झाले होते. त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी ऋषिराज यांना मृत घोषित केलं. मुलगा लिफ्टमध्ये अडकला या भीतीने गर्भगळीत झालेल्या पित्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तीन महिन्यांपूर्वी ऋषिराज यांच्या वडिलांचा मृत्यूही हार्ट अटॅकमुळेच झाला होता. ऋषीराज यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. ऋषीराज व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होते. सोसायटीच्या कामांमध्येही ते मदत करत असत.

प्रत्यक्षदर्शी विवेक सिंह काय म्हणाले?

याच इमारतीत राहणारे प्रत्यक्षदर्शी विवेक सिंह म्हणाले, “मुलगा लिफ्टमध्ये अडकला आहे हे पाहून ऋषिराज खूप घाबरुन गेला. तो इकडे तिकडे धावला. त्याने जनरेटर सुरु करण्याचाही प्रयत्न केला. साधारण तीन मिनिटं वगैरे गेली. पण मुलगा लिफ्टमध्ये अडकला आहे हे पाहूनच ऋषिराजची शुद्ध हरपली. आम्ही त्याला रुग्णालयात नेलं खरं पण त्याचा मृत्यू झाला.” या घटनेने संपूर्ण सोसायटीवरच शोककळा पसरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी काय सांगितलं?

या प्रकरणी पोलीसही तपास करत आहेत. मिसरोदचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनिष भदोरिया म्हणाले, “प्राथमिक माहितीवरुन हे कळलं आहे की ऋषिराज यांचा मुलगा लाईट गेल्याने लिफ्टमध्ये अडकला होता. त्याला सोडवण्यासाठी ऋषिराज प्रयत्न करत होते. पण ते खूप घाबरले होते म्हणूनच त्यांची शुद्ध हरपली. त्यांना रुग्णालयातही नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. “