एका फोटोवरून उत्तर प्रदेशमधील बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. विद्यालयाच्या उर्दू विभागाकडून फेसबुकवर एक पोस्टर पोस्ट करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये छापण्यात आलेल्या फोटोंवरून हा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर लागलीच विद्यालयाकडून त्यासाठी जाहीर माफी मागण्यात आली आहे. उर्दू विभागाच्या प्रमुखांनी माफी मागत तातडीने हे पोस्टर बदलल्याचं देखील जाहीर केलं आहे. या पोस्टरविरोधात एबीव्हीपी आणि आरएसएसशी संबंधित विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती.
नेमका प्रकार काय?
बनारस हिंदू विश्वविद्यालय अर्थात बीएचयूच्या उर्दू विभागाने फेसबुकवर एका सेमिनारचं पोस्टर जारी केलं होतं. या पोस्टरमध्ये उर्दू शायर अल्लामा इकबाल यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र, विद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा फोटो मात्र पोस्टरवरून गायब झाला होता. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.




एबीव्हीपी आणि आरएसएसशी संबंधित काही विद्यार्थ्यांनी याविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवत तक्रार केली. त्यावरून सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या. हे प्रकरण वाढू लागल्याचं पाहाताच विद्यालयाकडून हे पोस्टर तातडीने काढून घेण्यात आलं. काही वेळाने दुसरं पोस्टर पोस्ट करण्यात आलं. या पोस्टरमध्ये अल्लामा इकबाल यांचा फोटो काढून पंडित मदनमोहन मालवीय यांचा फोटो लावण्यात आला होता.
उर्दू विभाग प्रमुखांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
यासंदर्भात उर्दू विभागाचे प्राचार्य अहमद यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “या पोस्टरवरून वाद सुरू झाल्याचं मला समजताच मी लगेच ते हटवलं आणि त्याबद्दल माफी देखील माहितली आहे. मी सांगितलं की इकबाल यांच्याजागी पंडित मदन मोहन मालवीय यांचा फोटो असायला हवा. काही विद्यार्थ्यांनी पोस्टर पोस्ट केलं होतं. मी ते आधी पाहू शकलो नाही, पण तरी देखील मी या चुकीची जबाबदारी घेतो”.