ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका वेगवान अवजड ट्रकने कारला धडक दिली आणि त्यानंतर ती कार तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत महामार्गावर फरफटत नेली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुदैवाने, कारमधील बाप-लेक या मोठ्या अपघातातून सुखरूप बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
नेमकं काय घडलं?
हा अपघात भुवनेश्वर-कटक हायवेवरील हाय-टेक स्क्वेअरजवळ घडला. कार आणि ट्रक दोन्ही वाहने भुवनेश्वरहून कटकच्या दिशेने जात होती. अचानक ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकच्या पुढच्या भागात अडकली. कार अडकली असल्याचे माहीत असूनही ट्रक चालकाने गाडी न थांबवता, ती तशीच ५०० मीटरपर्यंत पुढे ओढत नेली. हायवेवर चाललेला हा थरार पाहून इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केले आहे.
घटनेची माहिती मिळताच भुवनेश्वरच्या मांचेश्वर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासणीत चालकाची वैद्यकीय चाचणी अल्कोहोल टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये त्याने दारू प्यायली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघात की जाणूनबुजून मारण्याचा प्रयत्न?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला हा एक अपघात होता. मात्र, कारला धडक बसल्यानंतर चालक प्रचंड घाबरला आणि त्याच भीतीच्या वातावरणात त्याने गाडी न थांबवता पुढे पळवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे कार फरफटत गेली.
दुसरीकडे, कारमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ट्रक चालकाने घाबरून नव्हे, तर कारमधील लोकांना ‘जाणूनबुजून’ जिवानिशी मारण्याच्या उद्देशानेच गाडी थांबवली नाही, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. या आरोपामुळे आता या अपघाताला गुन्हेगारी वळण मिळाले असून पोलीस यामागील हेतूचा तपास करत आहेत. हा ट्रक संबळपूरच्या दिशेने जात असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांमधून संताप आणि पोलिसांचे आवाहन
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भुवनेश्वरमधील नागरिकांनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या बेदरकार वाहतुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात रात्रीच्या वेळी अवजड वाहनांच्या वेगावर आणि वाहतुकीवर कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले जात आहेत. तसेच, या घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी तपासात मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
