आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष स्वाती मालिवाल यांच्या कथित हल्ल्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये १३ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या गैरवर्तन आणि घटनाक्रमाचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. एफआयआरनुसार मालीवाल यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहाय्यक विभव कुमारने त्यांना सात ते आठवेळा कानाखाली लगावली. त्यांच्या पोटात लाथा मारल्या. त्यावेळी माझी मासिक पाळी सुरू होती, तरीही त्यांनी मारहाण केली.”

FIR मध्ये स्वाती मालिवाल यांनी काय म्हटलंय?

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) माजी प्रमुख स्वाती मालिवाल यांनी एफआयआरमध्ये अनेक धक्कादायेक खुलासे केले आहेत. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री निवासा नेमकं काय काय घडंल ते त्यांनी नमूद केलंय. “१३ मे रोजी सकाळी ९ वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या ड्रॉईंग रूममध्ये हे भयानक कृत्य घडले. घटनेच्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. मात्र, एफआयआरमध्ये केजरीवाल यांचे नाव नमूद नाही”, अशी प्रतिक्रिया स्वाती मालिवाल यांनी माध्यमांना दिली.

हेही वाचा >> स्वाती मालिवाल यांचा जबाब नोंदवण्यासाठी घरी पोहचलं पोलिसांचं पथक, महिला आयोगाचं विभव कुमारांना समन्स

स्वाती मालिवाल FIR मध्ये म्हणाल्या, मी ड्रॉईंग रूममध्ये बसले होते. तेव्हा विभव कुमार आत आला आणि माझ्यावर ओरडू लागला. मला शिवीगाळ करू लागला. तुम्ही आमचे कसे ऐकू शकत नाही? तुम्हाला काय वाटते, तुच्छ बाई… आम्ही तुम्हाला धडा शिकवू, असं तो बोलू लागला.”

“त्यानंतर मला माहराण करण्यात आली. कुमारने ७-८ वेळा माझ्या कानाखाली लगावली. मला धक्का बसला होता. मी मदतीसाठी वारंवार ओरडत होते”, असंही त्यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे. तसंच, कुमारने त्यांच्या शर्टाला धरून त्यांना ओढले.

“सेंटर टेबलवर डोके आपटत असताना मी जमिनीवर पडले. मी मदतीसाठी सतत ओरडत होते पण कोणीही आले नाही”, असंही त्या म्हणाल्या. एवढ्यावरच विभव थांबला नाही, त्याने माझ्या छातीत, पोटात आणि ओटीपोटात लाथा मारल्या. माझा शर्ट वर येत होता, पण तरीही तो मला मारहाण करत होता”, अशीही आर्त कहाणी त्यांनी सांगितली.

“माझी मासिक पाळी सुरू होती, मला असह्य वेदना होत होत्या. तरीही मला मारहाण करण्यात आली. माझ्यावर पूर्ण ताकदीने हल्ला केला गेला”, असंही त्या म्हणाल्या.

देशाचे प्रश्न महत्त्वाचे

“माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मी माझे म्हणणे पोलिसांना दिले आहे. मला आशा आहे की योग्य ती कारवाई केली जाईल. काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानते. ज्यांनी चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी मी दुसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून करत असल्याचे म्हटलंय, देव या सर्वांना आशीर्वाद देवो. देशात महत्त्वाच्या निवडणुका सुरू आहेत, स्वाती मालिवाल महत्त्वाच्या नाहीत, देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपवाल्यांना विशेष विनंती आहे की या घटनेवर राजकारण करू नका, अशी एक्स पोस्ट स्वाती मालिवाल यांनी काल केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री निवासस्थानातील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे स्वाती मालिवाल सुरक्षा रक्षकांशी वाद घालताना दिसत आहेत. आता या व्हिडिओवरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.