वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे पुढील महिन्यात दक्षिण कोरिया व जपानचा दौरा करणार असून टोक्योतील ‘क्वाड’ परिषदेत सहभागी होतील आणि या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतील, असे व्हाइट हाऊसने सांगितले. बायडेन यांचा दक्षिण कोरिया व जपानचा दौरा २० ते २४ मे दरम्यान नियोजित आहे.

 ‘मुक्त व खुल्या हिंद- प्रशांत क्षेत्राबाबत बायडेन- हॅरिस प्रशासनाची कणखर बांधिलकी या दौऱ्यामुळे आणखी बळकट होईल’, असे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन प्साकी यांनी बुधवारी सांगितले.

 बायडेन हे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येऊल व जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. ‘हे नेते आमचे महत्त्वाचे सुरक्षाविषयक संबंध आणखी बळकट करण्याच्या, आर्थिक संबंध वाढवण्याच्या आणि प्रत्यक्ष निकाल देण्यासाठी आमच्या निकट सहकार्याचा विस्तार करण्याच्या संधींबाबत चर्चा करतील’, असे प्साकी म्हणाल्या.

हिंदप्रशांत क्षेत्रात चीनचे लष्करी अस्तित्व वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या क्षेत्रातील महत्त्वाचे सागरी मार्ग प्रभावमुक्त ठेवण्यासाठी नवे धोरण विकसित करण्यासाठी ‘क्वाड’ स्थापन करण्याच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत व जपान यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये मूर्त रूप दिले होते.