गुजरात: अदानींच्या मालकीचं बंदर पुन्हा वादात; पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या मालवाहू जहाजात सापडलं….

गुजरातमधील अदानी बंदरावर (Adani Port APSEZ) सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केलीय.

अदानी बंदर (मुंद्र बंदर), गुजरात

गुजरातमधील अदानी बंदरावर (Adani Port APSEZ) सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केलीय. या संयुक्त कारवाईत पाकिस्तानमधील कराचीतून चीनमधील शांघायमध्ये जाणाऱ्या एका मालवाहू जहाजात घातक किरणोत्सारी पदार्थ (Hazardous radioactive substances) सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अदानींच्या मालकीचं हे बंदर चर्चेत आलंय. याआधी देखील या बंदरावर अमली पदार्थ जप्त करण्याच्या मोठ्या कारवाया झाल्यात. या कारवाईबाबत अदानी बंदर प्रशासनानेच प्रसिद्धी पत्रक देत माहिती दिलीय. तसेच तपास संस्थांना पूर्ण सहकार्य केल्याचं नमूद केलं.

पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या या जहाजात कोणतेही धोकादायक किरणोत्सारी पदार्थ नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, १८ नोव्हेंबरला सीमा शुल्क आणि डीआरआयने तपासणी केली असता या मालवाहू जहाजावरील कंटेनरमध्ये वर्गवारी ७ मधील घातक किरणोत्सारी पदार्थ असल्याचं उघड झालं. यानंतर या जहाजावरील हे कंटेनर उतरवून तपासणी करण्यात येत आहे. हे जहाज अदानी बंदरावर उतरणार नव्हतं. ते पाकिस्तानमधील कराचीतून चीनमधील शांघायकडे जात होतं.

हेही वाचा : गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रानं…, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अदानी बंदर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही सीमाशुल्क विभाग आणि डीआरआयच्या या कारवाईत पूर्ण सहकार्य केलं. त्यांना तात्काळ कारवाई करण्यासाठी आणि समन्वयासाठी मदत केली. आम्ही त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो. भारताला असुरक्षित करणाऱ्या कोणत्याही गोष्टीवरील कारवाईसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अदानी समुह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला गंभीरपणे घेतो. त्याच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही.”

अदानी बंदरावरील ड्रग्ज प्रकरण नेमकं काय?

सप्टेंबर २०२१ मध्ये गुजरातमधील अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या मुंद्रा बंदरावर जवळपास ३,००० किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. ज्या जहाजात या ड्रग्जची तस्करी करण्यात आली त्या जहाजात प्रक्रिया न केलेली टाल्क पावडर असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात टाल्क पावडरच्या बॅगमध्ये हेरॉईन लपवून त्यावर टाल्क पावडरचं आवरण देण्यात आलं होतं. जेणेकरुन तपास यंत्रणांना या ड्रग्जचा तपास लागणार नाही.

हेही वाचा : गुजरातमधील ३००० किलो ड्रग्ज तस्करीप्रकरणी कारवाईला वेग, चेन्नईतील जोडप्याला कोठडी

इतकं करूनही हा मोठा ड्रग्ज साठा पकडण्यात यश आलं. यानंतर देशभरात ठिकठिकाणी या संदर्भात छापेमारी झाली. यात ८ जणांना अटक करण्यात आलं. त्यात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे.

या प्रकरणात आतापर्यंत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केलीय. २१ सप्टेंबरला दिल्लीत एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आलीय. यात काही अफगाणिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना दिल्लीत कोकेन आणि हेरॉईनसोबत अटक करण्यात आली होती. त्यांचा गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का हेही तपासलं जात आहे.

अदानी बंदरावर ड्रग्ज घेऊन आलेलं जहाज कोठून आलं?

कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी सापडलेली ही ३,००० किलोग्रॅम ड्रग्जची खेप मुळात अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आलं. इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरुन २ कंटेनर भारतात पाठवण्यात आले होते. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स (Semi processed talk stones) असल्याचं भासवत ही मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली. मात्र, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत या तस्करीवर कारवाई केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big action on radioactive cargo shipping from pakistan to china at adani port gujrat pbs

ताज्या बातम्या