पीटीआय, नवी दिल्ली : मध्य प्रदेशात सत्ता राखण्यासाठी भाजपने सारी ताकद लावली आहे. पक्षाने सोमवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत तीन केंद्रीय मंत्री तसेच चार खासदार आहेत. राज्यातील काँग्रेसचे आव्हान पाहता, ज्येष्ठ नेत्यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. त्यापैकी नरेंद्रसिंह तोमर व फग्गनसिंह कुलस्ते हे गेल्या वेळी म्हणजेच २०१८ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर उमेदवार आहेत. तर चारपैकी तीन खासदार हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या ठिकाणी लढत आहेत.
माजी प्रदेशाध्यक्ष तोमर यांना जुलैमध्येच प्रचार व्यवस्थापन समितीचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तीन वेळा खासदार असलेले तोमर हे २००८ पर्यंत दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पाच वेळा खासदार असलेले प्रल्हादसिंह पटेल हे पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. आदिवासी नेते अशी ओळख असलेले कुलस्ते हे १९९२ मध्ये आमदार होते. त्यानंतर सहा वेळा ते लोकसभा तर एकदा राज्यसभेचे सदस्य आहेत. चार वेळा खासदार असलेले गणेश सिंह पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.




राकेश सिंह हे चार वेळा खासदार असून, त्यांनाही पक्षाने रिंगणात उतरवले आहे. बडय़ा नेत्यांना संधी दिल्याने राज्यात भाजपची सत्ता आली तर नेतृत्त्वाचे अनेक दावेदार आहेत, असा संदेश पक्षाने दिला आहे. सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेला संधी देत चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल असेच पक्षाने सूचित केले आहे.
काँग्रेसचे उत्तर
भाजपने बडय़ा नेत्यांना उमेदवारी दिली तरी राज्यातील जनता त्यांचा पराभव करेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी व्यक्त केली आहे. निवडून आलेले सरकार भाजपने २०२० मध्ये पाडले याचा जनतेत संताप आहे असा दावा खेरा यांनी केला आहे.