Trump US Venezuela Oil Deal update : अमेरिकेचा व्हेनेझुएलाबरोबर एक व्यापक करार झाला असून हा करार प्रत्यक्षात आल्यानंतर अमेरिकेला व्हेनेझुएलातील मोठ्या प्रमाणावर अद्याप वापरात न आलेल्या तेलसाठ्यापर्यंत प्रवेश मिळू शकतो. तसंच, हा जगातील सर्वांत मोठा तेल करार असल्याचा दावाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. हा करार परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेलसी रॉड्रिग्ज यांनी वाटाघाटी करून पूर्ण केला असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे या कराराची घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

“युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने नुकताच व्हेनेझुएला देशासोबत जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या तेल करारावर स्वाक्षरी केली आहे! माझ्या निर्देशानुसार, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षण मंत्री (सेक्रेटरी ऑफ वॉर) पीट हेगसेथ यांनी व्हेनेझुएलाच्या अत्यंत आदरणीय हंगामी अध्यक्षा डेलसी रॉड्रिग्ज यांच्यासोबत जवळून काम केलं आहे. खाजगी क्षेत्रासोबतच्या भागीदारीच्या माध्यमातून, त्यांनी व्हेनेझुएलातील ६५ अब्ज बॅरलपेक्षा जास्त प्रमाणित तेल साठ्यावर अमेरिकेचे बहुसंख्य नियंत्रण सुरक्षित केलं आहे आणि तेही अमेरिकेच्या करदात्यांवर कोणताही खर्च न पडता. हा ऐतिहासिक व्यवहार अमेरिकेच्या तेल साठ्याला दुपटीहून अधिक करतो, तेल पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढवतो आणि भविष्यात प्रदीर्घ काळासाठी सर्व अमेरिकनांसाठी गॅस (पेट्रोल) च्या किमती लक्षणीयरीत्या कमी करेल. त्याच वेळी, हा करार व्हेनेझुएलाला प्रचंड यश आणि मोठ्या समृद्धीच्या मार्गावर नेण्यास मदत करेल. या व्यवहारामुळे व्हेनेझुएला आणि युनायटेड स्टेट्समधील आधीच वाढणारे संबंध अधिक दृढ होतील!” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

युद्धामुळे अमेरिकेत ऊर्जा पुरवठा धोक्यात

हा तेल करार ट्रम्प यांच्यासाठी देशांतर्गत पातळीवर एका कठीण काळात झाला आहे, कारण पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे त्यांच्या प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. इराणमधील युद्धाला आता सहा महिने पूर्ण झाले असून, त्याचा कोणताही स्पष्ट अंत दिसत नसल्याने ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता अधिक वाढली आहे. ऊर्जा क्षेत्रातील दबाव हाताळण्यासाठी अमेरिका आधीच आपल्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याचा वापर करत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला हा साठा ३०० दशलक्ष बॅरलच्या खाली घसरला, जी २०२६ च्या सुरुवातीपासून १०० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त मोठी घट आहे.

जानेवारीमध्ये मदुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन तेल कंपन्यांना व्हेनेझुएलामध्ये परत आणण्याबाबत चर्चा केली होती. व्हेनेझुएलाकडे अंदाजे ३०३ अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात मोठा तेल साठा असलेल्या देशांपैकी एक बनला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रूथवरील पोस्ट

यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, हे प्रमाण जागतिक तेल साठ्याच्या सुमारे १७ टक्के आहे. व्हेनेझुएलाचे बहुतांश तेल आधीच मॅप केलेले आणि ज्ञात आहे, याचा अर्थ कंपन्यांना नवीन साठ्यांचा व्यापक शोध घेण्याची आवश्यकता नाही. तथापि, देशाची तेल पायाभूत सुविधा अत्यंत खालावल्यामुळे, या साठ्याचे उत्पादनात रूपांतर करण्यासाठी देशाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. परिणामी, जागतिक साठ्यामध्ये इतका मोठा वाटा असूनही, व्हेनेझुएला सध्या जगातील केवळ १ टक्के तेलाचे उत्पादन करतो.