चांगले घर आणि गाडी न मिळाल्यामुळे नोकरशाहीबाबत नाराजी व्यक्त करत बिहारच्या मंत्र्याने दिला राजीनामा

नितीशकुमार यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी बरीच संपत्ती जमवली आहे असाही आरोप त्यांनी केला

Bihar Annoyed by the bureaucracy Nitish minister Madan Sahni resigned
नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांच्या संपत्तीबाबत चौकशी करण्याची मागणी साहनी यांनी केली आहे ( फोटो ANI)

बिहारमधील नितीशकुमार सरकारला मोठा धक्का बसला आहे. बिहारचे समाज कल्याण मंत्री मदन सहनी यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. साहनी यांनी नोकरशाहीबाबत नाराजी व्यक्त करताना आपल्याला चांगली गाडी व घर मिळाले नाही असेही म्हटले आहे. जर त्यांना लोकांची सेवा करता येत नसेल तर त्यांनी या पदावर रहाण्याचे कारण नाही असे साहनी म्हणाले. मात्र, ते नितीशकुमार यांच्यासोबतच आहेत असेही त्यांनी सांगितले.

“मी नोकरशाहीच्या निषेधार्थ राजीनामा देत आहे. मला मिळालेल्या गाडी आणि घराबद्दल मी समाधानी नाही, कारण जर मी लोकांची सेवा करू शकत नाही, जर अधिकारी माझे ऐकत नाहीत तर लोकांचे काम करता येणार नाही. जर त्यांचे काम केले जात नसेल तर मला याची (मंत्रीपदाची) गरज नाही,” असे साहनी यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितले.

अधिकाऱ्यांनी ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप साहनी यांनी केला आहे. नितीशकुमार यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी बरीच संपत्ती जमवली आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे निकटवर्ती चंचल कुमार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी मदन सहनी यांनी केली आहे.

मदन साहनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की “आपण अनेक वर्षांपासून हुकूमशाहीचा सामना करत आहोत, आपल्यावर अत्याचार होत आहेत पण आता ते सहन केले जाऊ शकत नाही. आता राजीनामा देण्याचा निर्णय मी नक्की केला आहे. जेव्हा मी कुणाचेही चांगले करू शकत नाही तेव्हा मी फक्त सोयी सुविधा घेण्यासाठी नाही बसलेलो.” पक्षातून राजीनामा देण्याच्या प्रश्नावर सहानी म्हणाले की, ते पक्षातच राहतील आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातही असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bihar annoyed by the bureaucracy nitish minister madan sahni resigned abn

ताज्या बातम्या