बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार गुरूवारी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. नितीश कुमार यांनी जदयूच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितीश कुमार यांनी जनतेने एनडीएला बहुमत दिलं असून सरकार स्थापन केलं जाईल अशी माहिती दिली. नितीश कुमार यांनी यावेळी आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नसून एनडीए निर्णय घेईल असं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी समोर येत आपल्या ‘अखेरची निवडणूक’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. तसंच आपण निवृत्ती घेणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सप्ष्ट केलं.

“मी निवृत्तीबद्दल वक्तव्य केलं नव्हतं. मी आपल्या प्रत्येक निवडणुकीच्या अखेरच्या रॅलीत कायम एक गोष्ट सांगत असतो. शेवट चांगला तर सर्वकाही चांगलं. तुम्ही माझं भाषण ऐकाल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल,” असं नितीश कुमार म्हणाले. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भविष्यात आपण निवृत्त होणार नसून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यापूर्वी पूर्णियामध्ये जदयूच्या एका उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत नितीश कुमार यांनी संबोधित केलं होतं. “निवडणुकीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणूक संपणार आहे आणि ही माझी अखेरची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सर्वकाही चांगलं,” असं नितीश कुमार त्यावेळी म्हणाले होते.

आणखी वाचा- बिहारमध्ये राजकीय उलथापालथ? तेजस्वी यादव महागठबंधनचं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत

निवडणुकांनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर

“शपथग्रहण दिवाळीनंतर की छठनंतर करायचा याबद्दल अद्याप ठरलेलं नाही. उद्या एनडीएची बैठक होणार असून तिथे निर्णय घेतला जाईल. जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे. एनडीए सरकार स्थापन करणार,” असं नितीश कुमार म्हणाले होते. जदयूच्या जागा कमी होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता नितीश कुमार यांनी जो निकाल आला आहे त्याचं विश्लेषण करण्यात आलं. आमच्या जागांवर काय परिणाम झाला याबाबत अध्ययन केलं जात असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी दिली. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री कोण होणार? असं विचारण्यात आलं असता, “आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नाही, एनडीए निर्णय घेईल” असं सांगितलं होतं.

आणखी वाचा- बिहारमधील ६८ टक्के नवनविर्वाचित आमदारांवर फौजदारी खटले; १२३ जणांवर हत्या, अपहरणासारखे गंभीर गुन्हे

एनडीएला बहुमत

एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या तिथे यावेळी ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे.