NDA Seat Sharing For Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यामध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल २४३ सदस्यांच्या विधानसभेत प्रत्येकी १०१ जागांवर लढणार आहेत. याचबरोबर एनडीएचा भाग असलेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना २९ जागा देण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा यांना प्रत्येकी ६ जागा देण्यात आल्या आहेत. या जागावाटपाबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (रविवारी) केली.
गेल्या निवडणुकीत कसे होते जागावाटप
२०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ११५ जागा लढवणाऱ्या, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाच्या यंदा १४ जागा कमी झाल्या आहेत. तर, भाजपाच्या ९ जागा कमी झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाने ११० जागा लढवल्या होत्या. गेल्या वेळी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास) स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनदा दल पहिल्यांदाच भाजपापेक्षा जास्त जागा लढवणार नाही.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून घोषणा
गेल्या वर्षी हरियाणामध्ये भाजपाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, बिहारमधील एनडीएच्या मित्रपक्षांनी जागावाटपाचे स्वागत केले आहे.
“एनडीएच्या मित्रपक्षांनी मैत्रीपूर्ण वातावरणात जागांचे वाटप पूर्ण केले आहे. एनडीएच्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी याचे स्वागत केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहे आणि पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे”, असे एक्स पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीच्या जागापाटपाची प्रतिक्षा
दरम्यान, नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला सत्तेतून बाहेर करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडिया आघाडीने घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नसल्याचे म्हटले आहे. याचबरोबर जागावाटप लवकरच जाहीर केले जाईल असे स्पष्ट केले आहे.
“इंडिया आघाडीत सर्व काही ठीक आहे. सर्व गोष्टी निश्चित झाल्या आहेत. उद्या पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये सर्व माहिती दिली जाईल”, असे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र यांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील जागावाटपाच्या कथित वादाच्या पार्श्वभूमीवर, राजद नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंह विमानात गप्पा मारतानाचा एक फोटो व्हायरल झाला. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव ज्या विमानाने प्रवास केला होता त्या विमानात अखिलेश प्रसाद सिंहही उपस्थित होते.
