Bihar Vidhan Sabha Nivadnuk Nikal Updates: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून राज्यात एनडीए प्रचंड मोठे बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. यादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून विरोधीपक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने होणाऱ्या निवडणुकीतील पराभवाचे प्रतीक बनले आहेत, असा दावा भाजपने केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगावर नागरिकांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.

राहुल गांधी! आणखी एक निवडणूक, आणखी एक पराभव! जर निवडणुकीतील सातत्यासाठी जर पुरस्कार असते, तर सर्वच पुरस्कार त्यांनाच मिळाले असते. या वेगाने, पराभवांनाही आश्चर्य वाटत असेल की ते इतक्या खात्रीपूर्वक पद्धतीने त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतात,” असे एका भाजपा नेत्याने म्हटले आहे.

राहुल गांधी हे बिहारमध्ये काँग्रेसचे स्टार प्रचारक होते आणि त्यांनी या निवडणुकीत सातत्याने महागठबंधनच्या सभांमधून ‘वोट चोरी’चा मुद्दा उपस्थित केला होता, तसेच त्यांनी निवडणूक आयोग भाजपाच्या विजयासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला आहे.

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहार निवडणूक मतदान मोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर आहे. सध्या एनडीए हे १९९ जागांवर आघाडीवर आहे. तर आरजेडीच्या नेतृ्त्वाखालील महागठबंधनला ३८ जागांवर आघाडी मिळाली आहे, ज्यामध्ये काँग्रेसला अवघ्या ४ जागांवर आघाडी आहे. एनडीएमध्ये भाजपा ९० मतदारसंघात आघाडीवर आहे, तर जेडीयू ८१ जागांवर आघाडीवर आहे, तर चिराग पासवान यांची एलजेपी हा पक्ष २१ जागांवर आघाडीवर आहे.

भाजपाचे सुधाशू त्रिवेधी यांनी कबीर दास यांच्या दोन ओळी ऐकवत काँगरेसची खिल्ली उडवली आहे. त्यांनी पक्षाला निकालाची अचूकतेची खात्री करून घेण्यासाठी मतदार याद्या तपासून घेण्याची विनंती केली आहे.

“१५० आणि १७५ जागांचा टप्पा ओलांडल्यानंतर, आम्ही आता २०० च्या दिशेने वाटचाल करत आहोत… मला काँग्रेससाठी कबीर दासांची एक ओळ कोट करायची आहे, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, ‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो मन खोजा अपना, तो मुझसे बुरा न कोय। (जेव्हा मी वाईट व्यक्ती शोधायला निघालो, तेव्हा मला कोणीही वाईट आढळले नाही. पण जेव्हा मी स्वत:च्या मनात डोकावून पाहिले, तेव्हा माझ्यापेक्षा वाईट कोणी नव्हते),” असे ते म्हणाले आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर “राहुल गांधी हे नंबर १ आहेत – निर्विवाद, अद्वितीय, आणि अपराजित” असे म्हणत खोचक टीका केली आहे. “९५ निवडणुकांमध्ये पराभव आणि ही संख्या वाढतच आहे. जवाहरलाल नेहरूच्या जयंतीदिनीच हे घडावे हा काही योगायोग नाही.” असेही ते म्हणाले आहेत.

काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका

या निकालावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून काँग्रेसने निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल केला आहे. पक्षाचे नेते पवन खेरा यांनी असा दावा केला आहे की, बिहारमधील खरी लढाई एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये नाही तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भारतातील नागरिकांमध्ये आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, “ही मतमोजणीची फक्त सुरुवात आहे आणि आम्ही वाट पाहत आहोत. सुरुवातीच्या कलांवरून असे दिसून येते की ज्ञानेश कुमार बिहारच्या लोकांवर प्रभाव पाडत आहेत. एसआयआर आणि ‘वोट चोरी’ सारख्या मुद्द्यांना न जुमानता लोकांनी मोठे धाडस दाखवले आहे. ज्ञानेश कुमार किती प्रभावी ठरतील हे पाहणे बाकी आहे. ही लढत भारतीय निवडणूक आयोग आणि बिहारच्या लोकांमध्ये आहे.”

यावेळी पवण खेरा यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी एका लोकप्रिय पुस्तकाच्या शीर्षकाचा उल्लेख केला आणि म्हटले की, मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी काम करत आहेत. “‘टू सर्व्ह विथ लव्ह’ नावाचे एक पुस्तक आहे. ज्ञानेश कुमार गुप्ता हे पुस्तक पंतप्रधान मोदींसाठी लिहित आहेत,” असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळात स्पष्टपणे पक्षपातीपणा केल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक वेळी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. दरम्यान, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, मतमोजणी पुढे सरकत असून एनडीए हळूहळू आपली आघाडी वाढवत आहे.