Bihar Vidhan Sabha Nivadnuk Nikal Updates: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएला १८० जागांवर आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. तर आरजेडी आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीला सुमारे ५० जागांवर आघाडी आहे. अशात या निकालावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल केला आहे. पक्षाचे नेते पवन खेरा यांनी असा दावा केला आहे की, बिहारमधील खरी लढाई एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये नाही तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भारतातील नागरिकांमध्ये आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, “ही मतमोजणीची फक्त सुरुवात आहे आणि आम्ही वाट पाहत आहोत. सुरुवातीच्या कलांवरून असे दिसून येते की ज्ञानेश कुमार बिहारच्या लोकांवर प्रभाव पाडत आहेत. एसआयआर आणि ‘वोट चोरी’ सारख्या मुद्द्यांना न जुमानता लोकांनी मोठे धाडस दाखवले आहे. ज्ञानेश कुमार किती प्रभावी ठरतील हे पाहणे बाकी आहे. ही लढत भारतीय निवडणूक आयोग आणि बिहारच्या लोकांमध्ये आहे.”

यावेळी पवण खेरा यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी एका लोकप्रिय पुस्तकाच्या शीर्षकाचा उल्लेख केला आणि म्हटले की, मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी काम करत आहेत. “‘टू सर्व्ह विथ लव्ह’ नावाचे एक पुस्तक आहे. ज्ञानेश कुमार गुप्ता हे पुस्तक पंतप्रधान मोदींसाठी लिहित आहेत,” असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळात स्पष्टपणे पक्षपातीपणा केल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक वेळी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. दरम्यान, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, मतमोजणी पुढे सरकत असून एनडीए हळूहळू आपली आघाडी वाढवत आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले असून नितीश कुमार यांच्या जनता दल पक्षाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. जेडीयूचे तब्बल ७५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर ८५ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडी आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षाला केवळ ३६ जागांवर आघाडी मिळाली आहे; तर काँग्रेसचे सहा उमेदवार आघाडीवर आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा असून त्यापैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तब्बल १८० हून अधिक जागांची आघाडी घेतली आहे.