Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत भाजपा-जदयूच्या आघाडीचा दणदणीत विजय झाला असून एनडीएला २०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलाला मोठा झटका मिळाला असून काँग्रेसचेही पानिपत झाले आहे. लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांचाही दणदणीत पराभव झाला आहे. काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून बेदखल केले होते. त्यानंतर त्यांना राजकारणातही मोठा धक्का बसला आहे.
तेजप्रताप यादव यांना पक्षातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी जनशक्ती जनता दल या पक्षाची स्थापना केली होती. ते स्वतः महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र या मतदारसंघात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
महुआ विधानसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) उमेदवार संजय कुमार सिंह यांचा विजय झाला आहे. संजय कुमार सिंह यांनी ८७,६४१ मते मिळवली आहेत. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे मुकेश कुमार रौशन यांना ४२,६४४ मते मिळाली आहेत. तर तेजप्रताप यादव यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यांना ३५,७०३ मते मिळाली आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर आरजेडीने या जागेवर उमेदवार दिला नसता तर कदाचित तर लोजपचे उमेदवार संजय कुमार सिंह आणि तेजप्रताप यादव यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली असती. मात्र तेजस्वी यादव यांनी मुकेश कुमार यांना तिकीट दिल्यामुळे मतविभाजनाचा फटका बसून तेजप्रताप यांचा पराभव झाला.
महुआ विधानसभेचा इतिहास इतिहास
महुआ विधानसभा मतदारसंघ हा वैशाली जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. होजीपूर लोकसभेच्या अंतर्गत हा मतदारसंघ येतो. २०२० साली आरजेडीचे मुकेश कुमार रोशन इथून निवडून आले होते.
