AIMIM vs Congress in Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. दुपारी अडीच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार निवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) वरचष्मा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेले निवडणुकीचे कौल पाहता महाआघाडीचा (महागठबंधन) दारूण पराभव होणार असल्याचं दिसत आहे. एनडीएने द्विशतकी संख्या गाठली आहे. एनडीए २०१ जागांवर आघाडीवर आहे. तर, महागठबंधनचे उमेदवार केवळ ३६ जागांवर पुढे आहेत.

दुपारी दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टी ९० जागांवर आघाडीवर आहे. तर, जनता दलाचे (संयुक्त) ८२ उमेदवार पुढे आहेत. लोक जनशक्ती पार्टी देखील २४ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाला चार जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे आता एनडीएने द्विशतक गाठलं आहे. अद्याप कोणाच्याही विजयाची घोषणा झालेली नाही. परंतु, मतमोजणीच्या १६ फेऱ्यांनंतर अनेकांचा विजय निश्चित मानला जात आहे.

एनडीएची द्विशतकाकडे वाटचाल, महाआघाडी अर्धशतकापासून दूर?

दुसऱ्या बाजूला, महाआघाडीमधील पक्षांची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय जनता दल २६ जागांवर, तर काँग्रेसला एकेरी जागांवर समाधान मानावं लागेल असं दिसत आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार ४ जागांवर आघाडीवर आहेत. बिहारमध्ये २४३ सदस्यांच्या सभागृहात एनडीए १२२ च्या बहुमताच्या टप्प्यापुढे गेली आहे. हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा दणदणीत विजय असल्याची टिप्पणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

असदुद्दीन ओवैसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा वरचढ?

दरम्यान, या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पार्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एमआयएमने एनडीए किंवा महाआघाडीबरोबर युती केली नाही. ‘एकला चलो रे’ चा नारा देत निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमने अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतं मिळवली असून पाच मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली आहे. त्या तुलनेत अनेक वर्षे देशात सत्ता गाजवणाऱ्या व देशातील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस या निवडणुकीत एमआयएमपेक्षाही मागे राहिली आहे. कारण काँग्रेसला केवळ चार जागांवर आघाडी मिळाली आहे. राष्ट्रीय जनता दलासह अनेक पक्षांचं सहकार्य मिळाल्यानंतरही काँग्रेस एमायएमपेक्षा मागे राहिली आहे.