Bihar Assembly Election Results 2025 Explained : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) दणदणीत विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करत २४३ पैकी २०० हून अधिक जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा दारूण पराभव झाला आहे. विरोधकांना ४० ही संख्या देखील गाठता आलेली नाही.

भारतीय जनता पार्टीचा वाढलेला स्ट्राइक रेट, लोकजनशक्ती पार्टीचा (रामविलास पासवान) प्रचंड स्ट्राइक रेट, एनडीएची त्सुनामी, प्रशांत किशोर निष्प्रभ, काँग्रेसपेक्षा एमआयएम पार्टीची बरी कामगिरी, राष्ट्रीय जनता दल पक्षाला मिळालेली प्रचंड प्रमाणात मतं यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनी लक्ष वेधलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पाच महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत.

१. भाजपाचा स्ट्राइक रेट

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ११० उमेदवार उतरवले होते. त्यापैकी ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. याचा अर्थ भाजपाला ८२.७२ टक्के यश मिळालं आहे.

२. एनडीए २०० पार

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) २०० हून अधिक जगांवर आघाडी मिळवली आहे. बिहारमध्ये एनडीएची त्सुनामी पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांना १६० ते १८० मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, एनडीए २०० पार गेली आहे.

३. प्रशांत किशोर निष्प्रभ

निवडणूक रणनीतीकार, देशातील अनेक पक्षांना आजवर निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्यात सहाय्य करणारे प्रशांत किशोर यांनी यावेळी स्वतःचा पक्ष निवडणुकीत उतरवला होता. मात्र, त्यांना या निवडणुकीत यश मिळालं नाही. त्यांनी २३८ जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

४. काँग्रेस एमआयएमच्या मागे?

या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पार्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एमआयएमने एनडीए किंवा महाआघाडीबरोबर युती केली नाही. ‘एकला चलो रे’ चा नारा देत निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमने अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतं मिळवली असून पाच मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली आहे. त्या तुलनेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस या निवडणुकीत एमआयएमपेक्षाही मागे राहिली आहे. कारण काँग्रेसला केवळ चार जागांवर आघाडी मिळाली आहे.

५. राजदला प्रचंड मतं

या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा पराभव झाला आहे. राजदला केवळ २५ जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, मतांच्या बाबतीत हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत राजदला १ कोटी १० लाख ६३ हजार मतं मिळाली आहेत. संयुक्त जनता दलाला ९२ लाख ८४ हजार, भाजपाला ९७ लाख ५५ हजार, काँग्रेसला ४२ लाख ३५ हजार, लोकजनशक्ती पार्टीला (रामविलास पासवान) २४ लाख ३९ हजार मतं मिळाली आहेत.