Bihar Assembly Election Results 2025 Shivsena UBT Remark : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार हे देखील स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आतापर्यंत समोर आलेल्या कौलांनुसार एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार बिहारच्या निवडणुकीत एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. तर, विरोधकांच्या महाआघाडीला केवळ ३० जागांवर आघाडी मिळाली आहे. एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
या निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेने (उबाठा) त्यांच्या मित्रपक्षांना, प्रामुख्याने काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे “देशातील विरोधी पक्षांना एक सल्ला, देशातील महिलांशी संवाद साधा. त्यांच्याशी बोलण्याव्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय नाही, त्यांच्याशिवाय बदल शक्य नाही. धन्यवाद.”
यंदा बिहारमधील मतदानात महिला मतदारांनी ऐतिहासिक कल दर्शवला आणि अनेक मूलभूत घटकांनी मतदारांचा कल निश्चित केला. त्यावरूनच चतुर्वेदी यांनी हा सल्ला दिला आहे.
प्रियांका चतुर्वेदींच्या सल्लामागचं कारण काय?
बिहारमध्ये यंदा एकूण ६७.१३ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. परंतु, केवळ महिला मतदारांची उपस्थिती ७१.७८ टक्के होती, जी पुरुषांच्या ६२.९८ टक्के मतदानापेक्षा खूप जास्त आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये, महिलांनी पुरुषांपेक्षा १० ते २० टक्के अधिक मतदान केलं आहे. सुपौलमध्ये ही तफावत सर्वाधिक असल्याचे दिसून आलं. किशनगंज, मधुबनी, गोपालगंज, अररिया, दरभंगा आणि मधेपुरा येथेही अशीच तफावत नोंदवली गेली. गेल्या जवळपास १५ वर्षांपासून महिला मोठ्या संख्येने मतदान करत आहेत, पण २०२५ हे असं वर्ष ठरलंय, जेव्हा महिलांच्या विक्रमी सहभागाने सर्वांना आश्चर्यचकित केले. महिलांसाठी विशिष्ट प्रचार, महिलांसाठीच्या योजनांनंतर महिलांचं मत मिळवण्यात सत्ताधारी यशस्वी झाल्याचं विश्लेषण केलं जात आहे. त्यावरून चतुर्वेदी यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे की तुम्ही महिलांशी बोलायला हवं.
मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमुळे एनडीएला बिहारमध्ये मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना १०,००० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि याच योजनेमुळे महिलांचा एनडीएला मोठा पाठिंबा मिळाला.
