Bihar Assembly Election Results 2025 Vinod Tawde on Prashant Kishor : बिहार विधानसभा निवडणुकीमधील एनडीएच्या विजयात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांचं मोठं योगदान आहे. भाजपाने या निवडणुकीची जबाबदारी तावडे यांच्यावर सोपवली होती आणि तावडे यांनी ही जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. या निवडणुकीत एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. तर, विरोधकांच्या महाआघाडीला केवळ ३० जागांवर आघाडी मिळाली आहे. एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “हे आमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.”
विनोद तावडे म्हणाले, “या निवडणुकीला सामोरे जाताना आमच्या डोक्यात एकच गोष्ट होती. आपण बिहारला जातीच्या राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे. बिहारला जातीच्या वर काढायचं असेल तर आपल्याला विकासाचा मुद्दा हाती घ्यावा लागेल. आम्ही बिहारमध्ये विकास सुरू केला, विकासाने गती पकडली आणि त्यानंतर आम्ही प्रचार सुरू केला. ‘रफ्तार पकड चुका हैं बिहार’ या टॅगलाइनसह आम्ही प्रचार सुरू केला.” विनोद तावडे हे एबीपी माझाशी बोलत होते.
प्रशांत किशोर यांच्याबद्दल एनडीएची काय होती रणनीती?
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले, “प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढण्याबाबत घोषणा केल्यापासून आम्हाला त्यांच्याबद्दल महिती होती. हे नाणं काही चालणार नाही याबाबत आम्ही ठाम होतो. त्यांनी अत्यंत हुशारीने प्रयत्न सुरू केले. स्वतः लाइमलाइटमध्ये राहिले. त्यामुळे आम्ही सर्वांनी, एनडीएमधील नेत्यांनी ठरवलं की प्रशांत किशोर यांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही. त्यांना मोठं कराचं नाही आणि ते मोठे झाले नाहीत.”
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा का जाहीर केला नाही?
या निवडणुकीत एनडीएची आणखी एक रणनीती होती. एनडीएने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता? नितीश कुमार विद्यमान मुख्यमंत्री असूनही त्यांचं नाव जाहीर केलं नव्हतं. यावरून तावडे यांना विचारण्यात आलं की तुम्ही नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून का जाहीर केला नाही? यावर विनोद तावडे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आम्ही ना राजस्थानमध्ये जाहीर केला, ना मध्य प्रदेशात, ना महाराष्ट्रात ना बिहारमध्ये. विरोधकांचा डाव होता की नितीश कुमार आजारी आहेत असा प्रचार करायचा, आजारी माणसाला मुख्यमंत्री केलं असा त्यांना अपप्रचार करायचा होता. विरोधकांचा हा डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नाही.
