नवी दिल्ली : बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना जबरदस्त धक्का बसला. भाजप व नवीन कुटुंबाच्या परंपरागत बालेकिल्ल्यामध्ये जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी विजय मिळवून पक्षाचा आणि स्वत:चा पहिला विजय मिळवला.
नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्याने येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. किशोर यांनी भाजपच्या नीरज कुमार सिन्हा यांचा १९ हजार ३२४ मतांनी दणदणीत पराभव केला. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघातही भाजपला धक्का बसला. गुजरातमधील मंजलपूर मतदारसंघात मात्र भाजपला यश मिळाले.
बांकीपूरमधील भाजपच्या पराभवानंतर पक्षांतर्गत मतभेदाचा मुद्दा पुढे आला आहे. या मतदारसंघामध्ये नवीन यांच्या विश्वासातील उमेदवार ऐन वेळी बदलला गेला. त्यानंतर नवीन यांच्या मतदारसंघातील वर्चस्वाबद्दल प्रश्नचिन्ह लागले होते. बिहारमधील मुख्यमंत्री बदलाचा फटका भाजपला बसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. समन्वयवादी, भ्रष्टाचाराचे आरोप नसलेले नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून भाजपने सम्राट चौधरी या कथित वादग्रस्त नेत्याला मुख्यमंत्री केल्याचा परिणाम भाजपला भोगावा लागला असे मानले जात आहे. या मतदारसंघात भाजपचा ३० वर्षांनी पराभव झाला.
जातीची समीकरणे बिघडली?
बांकीपूरमध्ये भाजपने जातीची समीकरणेही गृहीत धरली होती, पण सवर्ण व बनिया मतदारांमध्येही फूट पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मतदारसंघामध्ये सवर्ण मतदार ३३ टक्के असून त्यामध्ये नितीन नवीन यांच्या जातीचे कायस्थ मतदार सुमारे १४ टक्के आहेत. बिगरकायस्थ १९ टक्के आहेत. शिवाय १२ टक्के वैश्य मतदार आहेत. अशा ४५ टक्क्यांच्या भरभक्कम पाठिंब्यावर नितीन नवीन पाच व त्यांचे वडील चार वेळा आमदार बनले. या वेळी या दोन्ही मतांमध्ये फूट पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशांत किशोर हे ब्राह्मण असून इथे प्रत्येकी ७ टक्के ब्राह्मण व भूमिहार व ५ टक्के राजपूत आहेत. नितीशकुमार यांच्यामुळे १५ टक्के अतिमागास मतदारही भाजपला मतदान करत होता. या वेळी नितीशकुमार नसल्याने या मतदारांमध्येही फूट पडल्याचे मानले जाते.
लालूंचा पक्ष तिसर्या क्रमांकावर
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा हा पहिला विजय असून बिहारच्या राजकारणात नवा प्रादेशिक पक्ष लक्षवेधी ठरू लागल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा गुप्ता तिसर्या क्रमांकावर राहिल्या. या पक्षाला मुस्लिम व दलितांची मते मिळतात, पण या वेळी ही मतेदेखील विभागली गेल्याचे मानले जात आहे. बिहारमध्ये जनता दल (सं) बरोबर पारंपरिक राष्ट्रीय जनता दल या प्रादेशिक पक्षांचीही घसरण झाल्याचे स्पष्ट झाले.
० प्रशांत किशोर (विजयी) : ६४ हजार १५१ (जनसुराज पक्ष)
० नीरज कुमार सिन्हा : ४४ हजार ८२७ (भाजप)
० रेखा गुप्ता : १४ हजार २७३ (राष्ट्रीय जनता दल)
० मताधिक्य : १९ हजार ३२४
दतियामध्येही भाजपचा पराभव
मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रत्यक्ष मैदानात न उतरता भाजपचे नेते आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी फिरवल्याची चर्चा सोमवारी भाजपच्या पराभवानंतर रंगली. या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कुंवर घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा ६ हजार १६ मतांनी पराभव केला.
काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची निवड अवैध ठरल्यामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपचे बलाढ्य नेते नरोत्तम मिश्रा यांना भाजपने उमेदवारी नाकारली. दतिया हा मिश्रा यांचा परंपरागत मतदारसंघ असूनही राज्यातील भाजपअंतर्गत सुरू असलेल्या सत्तास्पर्धेमुळे मिश्रांना बाजूला केल्याचे मानले जात होते. याच मतदारसंघातून सहा वेळा आमदार बनलेले मिश्रा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे विश्वासू मानले जातात. पोटनिवडणुकीत जिंकले असते तर मिश्रा राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले असते व त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला असता अशीही चर्चा केली जात होती. उमेदवारी नाकारण्याची बाब मिश्रांच्या पचनी पडली नाही. मिश्रांच्या मतदान केंद्रातदेखील भाजपच्या उमेदवार मागे पडल्याने ही निवडणूक भाजप विरुद्ध मिश्रा झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या पोटनिवडणुकीत चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी- कांशीराम या पक्षाला २२ हजारांहून अधिक मते मिळाली. त्यामुळेही भाजपचा पराभव झाल्याचे मानले जात आहे.
० कुंवर घनश्याम सिंह (विजयी) : ६६ हजार ७५७ (काँग्रेस)
० आशुतोष तिवारी : ६० हजार ७४१ (भाजप)
० दामोदर यादव (मंडल) : २२ हजार ५२७ (आझाद समाज पार्टी- कांशीराम)
० मताधिक्य : ६ हजार १६
भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रीय जनता दलातील नाराजांच्या पाठिंब्याने विजय मिळवता आला. कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करणार नाही. बिहारच्या जनतेशी आमची बांधिलकी आहे.- प्रशांत किशोर, जनसुराज पक्षाचे संस्थापक
