Bihar News: बिहारमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बेगुसराय येथे पाच जणांनी घरात घुसून पतीला कोंडून, त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेला पोटात तीव्र वेदना होत असल्याने नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगातून एक जिवंत काडतूस, दगड आणि लाकडाचा तुकडा बाहेर काढला. ११ जून रोजी चकिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ब्लेडने वार करुन केले जखमी

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११:३० वाजता ती शौचालयासाठी गेली असता, पाच जणांनी जबरदस्तीने घरात घुसून तिच्या पतीला एका खोलीत बंद केले. महिला बाहेर आल्यानंतर आरोपींनी तिचे तोंड दाबले आणि घराबाहेर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, ब्लेडने तिच्या छातीवर आणि मांडीवर वार करून जखमी करण्यात आले.

गुप्तांगात कोंबले काडतूस, दगड आणि लाकडाचा तुकडा

पीडितेने पुढे माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “मी जाऊबाईला फोन केला, तिने येऊन माझ्या पतीची सुटका केली आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आम्हाला रुग्णालयात जाण्यास सांगितले. आम्ही आधी बरौनी रुग्णालयात गेलो, तेथून आम्हाला सदर रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे माझ्यावर उपचार झाले, पण माझ्या गुप्तांगात सतत वेदना होत होत्या. वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी सांगितले की, गुन्ह्यादरम्यान झालेल्या जखमांमुळे या वेदना होत आहेत. त्यानंतर आम्ही घरी गेलो. मात्र, वेदना असह्य झाल्याने आम्ही पुन्हा सदर रुग्णालयात आलो. यावेळी झालेल्या तपासणीत डॉक्टरांनी गुप्तांगातून एक काडतूस, दगड आणि लाकडाचा तुकडा काढला. मला अजूनही वेदना होत आहेत,” अशी कैफीयत पीडितेने सांगितली. अत्याचारादरम्यान बेशुद्ध पडल्यामुळे गुप्तांगात वस्तूं कोंबल्याचे समजले नाही, असे पीडितेने सांगितले.

यापूर्वीही मारहाण, लैंगिक छळाचा प्रयत्न

तीन महिन्यांपूर्वीही तीन गुन्हेगारांनी घरात घुसून मारहाण केली होती आणि लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करून पैसे व दागिने लुटून नेल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असेही पीडितेने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुमार पांडे यांनी माध्यमांना दिली आहे. “महिलेच्या गुप्तांगातून एक काडतूस बाहेर काढण्यात आले आहे,” असे डीएसपी पांडे म्हणाले. या प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल असेही पांडे .यांनी सांगितले.