Bihar Begusarai Panchayat Case Spit Licking: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराची तक्रार दाखल केली म्हणून महिला पंचायतीसमोर जमिनीवरील थुंकी चाटण्यास लावले. बिहारमधील बेगुसराय येथे ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागिरकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना जूनमध्ये घडल्याचे सांगितले जात असून, आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

जून महिन्यातील घटना

जून महिन्यात ही घटना घडली होती, अशी माहिती समोर आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. २ जूनच्या रात्री शेजाऱ्याने घरात प्रवेश केला आणि धमकी देऊन बलात्कार केला, असे १ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपीने खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्याला पकडले. मात्र, पोलिसांना माहिती देण्याऐवजी ग्रामस्थांनी पंचायत बोलावली आणि दोघांनाही सार्वजनिकरीत्या अपमानित केले, असा आरोप महिलेने केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला ती महिला पंचातीच्या मध्यभागी कान धरून उभी असल्याचे दिसते. त्यानंतर तिला जमिनीवरील थुंकी चाटण्यास लावले जाते.

पंचायतीत काय घडलं, ग्रामस्थांचा दावा काय?

व्हिडीओत पुढे बलात्काराचा आरोप असलेला पुरुष देखील कान धरून माफी मागताना आणि उपस्थितांसमोर थुंकी चाटताना दिसत आहे. ३१ जुलै रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पहिल्यांदा व्हायरल झाला. यानंतर दुसऱ्याच दिवशी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी आता या घटनेबाबत वेगळाच दावा केला आहे. सदर महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले होते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.