पाटणा : बिहार सरकारने सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक सत्रापासून १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या गुणपत्रकांवरून ‘नापास’ हा शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता गुणपत्रकावर ‘नापास’ ऐवजी ‘कौशल्य प्रशिक्षणासाठी पात्र’ असा उल्लेख केला जाणार आहे.
‘बिहार बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग अँड एक्झामिनेशन’द्वारे (बीबीओएसई) चालवल्या जाणार्या व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांशी विद्यार्थ्यांना जोडणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. या निर्णयाबाबत माहिती देताना राज्याचे शिक्षणमंत्री मिथलेश तिवारी यांनी सांगितले की, केवळ एखाद्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा किंवा क्षमता संपत नाही. म्हणूनच अपयशाचा शिक्का मारण्याऐवजी विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याशिवाय, १०वीच्या पुरवणी परीक्षेस बसणार्या विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याचे विशेष सत्र आयोजित केले जाईल.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले
पारंपरिक पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बिहार सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून नुकतीच ६ ऑगस्ट रोजी सरकारी शाळांमध्ये शनिवारी ‘नो-बॅग डे’ (दप्तरमुक्त दिवस) पाळण्याची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या नियोजनानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेत चालणार्या शाळा शनिवारी मात्र सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंतच भरवल्या जाणार आहेत.
