बिहारमधील गंगा नदीत बुडालेल्या बोटीतील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला आहे. घटनास्थळी अजूनही शोधमोहीम सुरु असून या दुर्घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

बिहारमधील पाटणाजवळील सबलपूरमधून गांधी घाट येथे परतणारी बोट शनिवारी संध्याकाळी बुडाली. सबलपूरमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारतर्फे या पतंग महोत्सवासाठी बोट सोडण्यात येत होती. मात्र प्रेक्षकांची संख्या जास्त असल्याने या बोटींची संख्या कमी पडत होती. पतंग महोत्सवापासून जवळच एक अॅम्यूजमेंट पार्कदेखील आहे. या पार्कामध्येही शनिवारी संध्याकाळी चांगलीच गर्दी झाली होती.  त्यामुळे बोटींमधील प्रवाशांची संख्या वाढल्याचे समजते. जलसमाधी मिळालेल्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने बोट बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  गंगा नदीत बुडालेल्या या बोटीत ५० प्रवासी होते असे समजते. शनिवारी रात्रीपर्यंत १९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. रविवारी सकाळी आणखी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आता मृतांचा आकडा २४ पर्यंत पोहोचला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त करतानाच मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. बिहारमधील भाजप नेत्यांनी या घटनेसाठी पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरले आहे. घटनास्थळी रविवारी दुपारपर्यंत शोधमोहीम सुरु होती. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफचे पथक शोधमोहीम राबवत आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओही आता समोर आला असून एएनआय या वृत्तसंस्थेच्या हाती व्हिडीओ लागला आहे. २४ जणांच्या मृत्यूसाठी आता जबाबदार कोण असा संतप्त सवाल मृतांचे नातेवाईक विचारत आहेत.