Nishant Kumar Oath : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठा विजय मिळवला आहे. या घडामोडी सुरू असतानाच आता बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार हे आज ७ मे रोजी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
निशांत कुमार यांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा आज पार पडणार असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनं दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर भाजपाचे नेते सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात निशांत कुमार हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
दरम्यान, निशांत कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच जेडीयू (JDU) मध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांनी नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते राज्यसभेचे खासदार झाले. आता सम्राट चौधरी यांच्या सरकारमध्ये निशांत कुमार हे कॅबिनेट मंत्री होण्याची शक्यता आहे.
वृत्तानुसार, मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी १५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आता आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत आहेत. यामध्ये निशांत कुमार यांच्यासह आणखी काही आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असलेल्या २७ जणांपैकी निशांत कुमार यांच्यासह १२ जण जेडीयूचे असण्याची शक्यता आहे. निशांत कुमार यांचा मंत्रिमंडळात समावेश हा जेडीयूसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.
मंत्रिपदासाठी कोणाच्या नावाची चर्चा आहे?
जेडीयूमधून श्रवण कुमार, लेशी सिंग, मदन साहनी, झामा खान, सुनील कुमार, शीला मंडल, रत्नेश सदा, शैलेश कुमार मंडल, भगवान सिंह कुशवाहा, दामोदर रावत आणि निशांत कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय चौधरी यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये संतुलित सत्तावाटपाच्या सूत्राचं पालन करण्यात येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला १२ जागा मिळू शकतात. तसेच लोक जनशक्ती पक्षाला (राम विलास) ३ जागा मिळू शकतात, तर आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक जनता दल यांसारख्या मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते.
भाजपाकडून कोणाच्या नावाची चर्चा?
भाजपाकडून विजय कुमार सिन्हा, मंगल पांडे, दिलीप जयस्वाल, श्रेयासी सिंह, अरुण शंकर प्रसाद, लखिंद्र पासवान, राम कृपाल यादव यांच्यासह आदी नावांची मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पाटणा येथील गांधी मैदानावर होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
निशांत कुमार कोण आहेत?
निशांत कुमार यांचा जन्म २० जुलै १९७५ रोजी झाला. ते नितीश कुमार आणि स्वर्गीय मंजू सिन्हा यांचे एकुलते एक चिरंजीव आहेत. ते पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT), मेसरा येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक वर्षे राजकारणापासून दूर राहिल्यानंतर आणि आध्यात्मिक मार्गाची आवड व्यक्त केल्यानंतर आता त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.
नितीश कुमारांचा राजकीय चौकार पूर्ण?
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. मात्र, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा व राज्यसभा) आणि राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे (विधानसभा व विधानपरिषद) सदस्य होण्याची नितीश कुमार यांची जुनी इच्छा होती. ते यापूर्वी लोकसभा खासदार, विधानसभेचे आमदार आणि विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. आता राज्यसभा सदस्यत्वामुळे हा ‘चौकार’ पूर्ण झाला आहे. या पदभारामुळे त्यांना लालू यादव आणि दिवंगत सुशील मोदी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत स्थान मिळेल.
