बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. यावर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिलीय. चुकीची गोष्ट प्यायल्यानंतर अशीच परिस्थिती ओढावेल, असं मी वारंवार सांगत असल्याचं मत नितीश कुमार यांनी व्यक्त केलं. तसेच दारू वाईट आणि त्यामुळेच त्यावर बंदी घातल्याचं लोकांना सांगण्यासाठी पुन्हा मोहीम सुरू करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

नितीश कुमार म्हणाले, “चुकीची गोष्ट प्यायल्यानंतर अशीच परिस्थिती ओढावेल हे मी वारंवार सांगितलंय. मी अधिकाऱ्यांशी बोलतो आहे. दिवाळी सणानंतर मी विस्तृत आढावा घेणार आहे. दारू वाईट असते आणि त्यामुळे दारूबंदी आहे हे सांगण्यासाठी जनजागृती मोहीम पुन्हा एकदा सुरू करणं खूप आवश्यक आहे.”

“जे लोक विषारी दारू बनवत आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आलीय. ही कारवाई पुढेही सुरूच राहिल. मात्र, व्यापक मोहिमेची गरज आहे. सणानंतर आम्ही या गोष्टीचा आढावा घेऊ,” असं नितीश कुमार म्हणाले.

नेमकं काय झालंय?

बिहारमधील २ जिल्ह्यांमध्ये विषारी बनावट दारू प्यायल्यानं तब्बल २४ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. गोपालगंज आणि पश्चिम चंपारण्य या दोन जिल्ह्यात या घटना घडल्या. गुरूवारी (४ नोव्हेंबर) चंपारण्य जिल्ह्यातील तेलहुआ गावात विषारी दारू पिल्यानं ८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गोपालगंजमध्ये देखील विषारी दारू पिल्यानं मृत्यू झालेल्यांची संख्या १६ वर पोहचली. असं असलं तरी जिल्हा प्रशासनाने या मृत्यूंच्या कारणांची अधिकृत माहिती दिलेली नाही.

मागील १० दिवसात उत्तर बिहारमधील विषारी दारूमुळे मृत्यूची तिसरी घटना

बिहारमध्ये विषारी दारूवर कारवाई करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचं वारंवार समोर आलंय. उत्तर बिहारमध्ये मागील १० दिवसात विषारी दारूमुळे नागरिकांच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. या घटनेनंतर बिहारचे मंत्री जनरराम हे तातडीने गोपालगंजला पोहचले. यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं, “विषारी दारू पिल्यानं मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या पीडित व्यक्तींच्या कुटुंबांना मी भेट दिली आहे. हे सर्व एनडीए सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्रह असू शकतं.”

हेही वाचा : धक्कादायक, बिहारमध्ये विषारी दारू पिल्यानं २४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय

गोपालगंजचे पोलीस अधीक्षक आनंद कुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं, “गोपालगंज जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात मागील २ दिवसात संशयास्पदपणे काही लोकांचा मृत्यू झालाय. अद्याप शवविच्छेदन झालेलं नसल्यानं मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ३ पथकं या प्रकरणांचा तपास करत आहे.” स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही पीडित कुटुंबांनी काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

प्राथमिकदृष्ट्या हे सर्व मृत्यू विषारी दारू प्यायल्यानं झाल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केलाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान झालेल्या घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केलीय. स्थानिक दारू ठेकेदारांकडे विषारी दारू पिणाऱ्यांमध्ये अनुसुचित जातीतील २० जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे.