राजकारणात कोणाचीही कायमची मैत्री नसते किंवा शत्रुत्वही नसते. राजकीय संबंध एका ठिकाणी आणि वैयक्तिक संबंध एका ठिकाणी असतात. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयक माहिती जाणून घेतली. तेव्हा बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दुसरीकडे लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. चार महिन्यांनंतर नितीश कुमार यांना लालूंची आठवण झाल्याची टीका त्यांनी केली.

लालूप्रसाद यादव यांच्यावर रविवारी मुंबईतील एका रूग्णालयात एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांच्यातील फोनवरील संभाषणाचे वृत्त माध्यमांमध्ये मंगळवारी आले.

माध्यमांमध्ये हे वृत्त आल्यानंतर लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांना ही बाब पसंत पडली नाही. त्यांनी ट्विट करत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. लालूंवर रविवारी शस्त्रक्रिया झाली होती. हे दुसरे-तिसरे काही नसून उशिराने केलेला ‘कर्टसी कॉल’ होता. त्यांना लालूंच्या आरोग्याविषयी माहिती घ्यायची होती. पण आश्चर्य याचे आहे की, मागील चार महिन्यांपासून लालू आजारी आहेत. त्या काळात त्यांनी कधी फोन केला नाही. आज फोन करून त्यांनी चौकशी केली. कदाचित भाजपा आणि एनडीएचे लोक रूग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी करत असल्यामुळे त्यांनीही फोन केला, असा टोला लगावला.

नितीश कुमार यांच्याकडून लालूंना फोन केल्याचे वृत्त येण्याआधी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना काका (चाचा) म्हणत हल्लाबोल केला होता. नितीश यांना आता महाआघाडीशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, नितीश कुमार यांनी सर्व राजकीय शक्यतांना विराम देत ही भेट एक ‘कर्टसी कॉल’ होता, असे म्हटले. राजकीय संबंधासोबतच सामाजिक संबंधही असतात. लालूंवर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांच्या तब्येतीवरून फोन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही मी लालूंच्या प्रकृतीची चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले.